पुन्हा एकदा ईडीविरुद्ध राष्ट्रवादी...आक्रमकपणे उतरणार मैदानात - Meeting of NCP leaders on Anil Deshmukh issue | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

पुन्हा एकदा ईडीविरुद्ध राष्ट्रवादी...आक्रमकपणे उतरणार मैदानात

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 29 जून 2021

आता देशमुख यांच्या भोती ईडीने फास आवळण्यास सुरुवात केल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. 

मुंबई : माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावरील ईडीने (ED) केलेल्या कारवाईमुळे महाविकास आघाडी सरकारच्या अडचणीत वाढ झाली आहे. विरोधी पक्ष आरोप करत असतांना देशमुख यांची बाजू प्रसार माध्यमांसमोर मांडण्यात राष्ट्रवादीचे नेते कमी पडल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केली होती.  (Meeting of NCP leaders on Anil Deshmukh issue) 

आता देशमुख यांच्या भोती ईडीने फास आवळण्यास सुरुवात केल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या घरी प्रमुख नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. आज (ता. २९ जून) दिवसभरात ईडी कार्यालकडून देशमुख यांच्यावर कशी कारवाई केली जाते हे पाहून संध्याकाळी 5 वाजता राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. देशमुख यांच्यावरील कारवाईमुळे पक्षाची झालेली बदनामी त्यात येत्या काळात पक्षाची भूमिका ठरविण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आहे.

हे ही वाचा : अनिल देशमुखांना अटक होईल; सर्व पुरावे EDच्या हाती

दरम्यान, देशमुख यांना ईडीने समन्स पाठवून पुन्हा आज चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे देशमुख मंगळवारी ईडी कार्यालयात उपस्थित राहतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी शनिवारी (ता. २६ जून) देशमुख यांना चौकशीसाठी ईडीने हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, चौकशीचे मुद्दे कळल्यानंतरच उत्तरे देता येतील, अशी भूमिका घेत देशमुखांनी एकप्रकारे ईडीवर कुरघोडी केली होती. 

देशमुख यांच्या वकिलाने शनिवारी (ता. २६ जून) अनिल देशमुख ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाई टळली होती. त्यानंतर आज (ता. २८ जून) पुन्हा ईडीने समन्स पाठवून मंगळवारी चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

देशमुख यांच्या नागपूर येथील श्री साई शिक्षण संस्थेच्या खात्यावर चार कोटी १८ लाख रुपये जमा झाले होते. ते दिल्लीतील चार कंपन्यांमार्फत जमा झाले होते. या कंपन्या फक्त कागदोपत्री असून पैसे हस्तांतरणासाठी त्याचा वापर होतोय, असे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले. या कंपनीचे मालक असलेल्या जैन बंधूंचा जबाब नोंदवण्यात आला आहे.

हे ही वाचा : शिवसेना आमदार सुहास कांदेंनी दिला चक्क आत्मदहनाचा इशारा

देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख याने एका व्यक्तीला ही रक्कम पाठवून ट्रस्टमध्ये भरण्यास सांगितल्याचा ईडीचा दावा आहे. बारमालकांकडून घेतलेली ४ कोटी ७० लाखांची रक्कम ती हीच असल्याचा ईडीला संशय असून देशमुख यांच्यामार्फत त्यांच्या मुलाकडे व तेथून हवालामार्फत दिल्लीतील कंपनी व पुढे देशमुख यांच्या शिक्षण संस्थेत जमा झाल्याचा ईडीचा दावा आहे.

मनी लाँडरिंगप्रकरणी अनिल देशमुख यांच्याविरोधात तक्रार करणारे ॲड. तरुण परमार यांचा जबाब सोमवारी (ता. २८ जून) ईडीने नोंदवला. या वेळी त्यांनी काही कागदपत्रेही ईडी कार्यालयात सादर केली. या प्रकरणी ईडीने पुन्हा बोलवल्यास आपण उपस्थित राहून यंत्रणेला सहकार्य करू, असे परमार यांनी सांगितले आहे.  

Edited By - Amol Jaybhaye  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख