बाईक रॅली काढून झोपलेल्या सरकारला जाग आणणार; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा 

आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळे मराठा आरक्षण कायदा रद्द झाल्याने समाजात मोठा असंतोष आहे. तो व्यक्त करण्यासाठी तसेच जनजागृतीसाठी प्रथम बाईक रॅली काढण्याचे ठरले.
Maratha Kranti Morcha warns the government, jpg
Maratha Kranti Morcha warns the government, jpg

मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) महाविकास आघाडी सरकारची निष्क्रियता व नाकर्तेपणाच्या निषेधार्थ मुंबईत 27 जून रोजी दुचाकी रॅली काढण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. तरीही सरकारला जाग न आल्यास लवकरच मुंबईत महामोर्चा काढण्याचाही विचार सुरु आहे. (Maratha Kranti Morcha warns the government)

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मराठा आरक्षण रद्द केल्यावर क्रांती मोर्चाच्या राज्यव्यापी बैठकीत जिल्हावार बैठका घेण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार काल मुंबईची बैठक घेण्यात आली. बाईक रॅलीनंतरही सरकारला जाग न आल्यास एक दोन महिन्यात मुंबई महामोर्चा काढावा, असे मत त्या बैठकीत व्यक्त झाले. बहुसंख्य उपस्थितांनी त्याला मान्यता दिल्याचे कळते. मराठा आरक्षणासाठी राज्यात काढलेल्या 60 मोर्चांमध्ये मुंबई जिल्ह्याचा वेगळा मोर्चा निघालाच नव्हता. मुंबईत निघालेला शेवटचा मोर्चा हा राज्याचा होता, त्यामुळे आता मुंबईचा मोर्चा काढावा, असे मतही या बैठकीत सदस्यांनी व्यक्त केले. 

मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना बाईक रॅलीची माहिती दिली. आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळे मराठा आरक्षण कायदा रद्द झाल्याने समाजात मोठा असंतोष आहे. तो व्यक्त करण्यासाठी तसेच जनजागृतीसाठी प्रथम बाईक रॅली काढण्याचे ठरले. आरक्षणाखेरीज मराठा समाजाच्या अन्य मागण्यांवरही सरकारने अद्याप उपाययोजना केल्या नाहीत. त्याबाबत सरकारवर दबाव आणण्यासाठी लॉकडाऊननंतर किंवा लॉकडाऊनचे नियम पाळून आंदोलन कसे करावे याबाबतही चर्चा झाली.

महाविकास आघाडी सरकारने न्यायालयात आरक्षण टिकविण्यासाठी केलेले अपुरे प्रयत्न, मराठा उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी याबाबत केलेले अक्षम्य दुर्लक्ष व सरकारचा निष्काळजीपणा याविरोधात आंदोलन करणे जरुरी आहे, यावरही सर्व उपस्थितांचे एकमत झाले. या बाईक रॅलीत सर्व समाजबांधवांनी पूर्ण शक्तीनिशी सहभागी व्हावे, असेही आवाहन सकल मराठा समाज (मुंबई) व मराठा क्रांती मोर्चा (मुंबई) तर्फे करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com