मोठी बातमी : मनसुख हिरेन मृत्यूचं गुढ उकलले...शिवदीप लांडेंनी दिली माहिती - Mansukh Hirens death mystery solved says Shivdeep Lande | Politics Marathi News - Sarkarnama

मोठी बातमी : मनसुख हिरेन मृत्यूचं गुढ उकलले...शिवदीप लांडेंनी दिली माहिती

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 21 मार्च 2021

हे प्रकरण आपल्या करिअरमधील सर्वाधिक अवघड प्रकरण असल्याचे शिवदीप लांडे यांनी म्हटले आहे.

मुंबई : मनसुख हिरेन मृत्यूमागचे गुढ उकलले असल्याची माहिती एटीएसचे पोलिस उपमहानिरीक्षक शिवदीप लांडे यांनीच फेसबुकवरून दिली आहे. त्यांनी या प्रकरणाबाबत फेसबुक पोस्ट टाकली असून या अतिसंवेदनशील प्रकरणाचे गुढ उकलले अससल्याचे म्हटले आहे. तसेच हे प्रकरण आपल्या करिअरमधील सर्वाधिक अवघड प्रकरण असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. 

मनसुख हिरेन खून प्रकरणात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अतिशय वेगात तपास केला आहे. या तपासात आता पोलिस उपमहानिरीक्षक शिवदीप लांडे नुकतीच यांची एंट्री झाली होती. या प्रकरणात एटीएसने आज निलंबित पोलिस हवासदार विनायक शिंदे यांच्यासह बुकी नरेश धरे यांना अटक केली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर केल्यानंतर 30 तारखेपर्यंत विशेष एटीएस कोठडी सुनावण्यात आली आहे.

एटीएसकडून मनसुख हिरेन यांच्या हत्येचा मुख्य सुत्रधार सचिन वाझे असल्याचे म्हटले आहे. त्याच्या सांगण्यावरूनच या दोघांनी या कटात सहभाग घेतल्याचा दावा एटीएसने केला आहे. या दोघांना अटक केल्यामुळे एटीएसच्या हाती महत्वाचे धागेदोरे मिळाल्याचे बोलले जात होते. त्यातच शिवदीप लांडे यांनी या प्रकरणाचे गुढ उकलल्याची माहिती देत त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. 

काय म्हणाले शिवदीप लांडे?

अति संवेदनशील मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचे गुढ उकलले आहे. मी एटीएसमधील सर्व सहकाऱ्यांना सलाम करतो. त्यांनी मागील काही दिवस रात्रं-दिवस काम करून या प्रकरणाचा शोध घेतला. माझ्या पोलिस करिअरमध्ये हे प्रकरण आतापर्यंतचे सर्वात अवघड राहिले आहे, अशी फेसबुक पोस्ट शिवदीप लांडे यांनी टाकली आहे. 

हेही वाचा : फडणवीस दिल्लीत गेल्यानंतर ते पत्र समोर! शरद पवार म्हणाले...

कोण आहे विनायक शिंदे?

लखनभैया बनवाट चकमक प्रकरणात प्रमुख आरोपी प्रदिप सुर्यवंशी याच्यासह विनायक शिंदेही दोषी आढळला. पोलिस हवालदार असलेल्या शिंदेला त्यानंतर सेवेतून निलंबित करण्यात आले. नोव्हेंबर 2006 मध्ये ही चकमक झाली होती. वाझे, सुर्यवंशी व शिंदे या तिघांनीही एकत्रित काम केले आहे. शिंदे हा मे 2020 पासून पॅरोलवर बाहेर आहे. 

मनसुख हिरेन प्रकरणाशी संबंध?

सचिन वाझेच्या सांगण्यावरून विनायक शिंदे याने आज अटक करण्यात आलेला बुकी व इतर काहींना एकत्रित केल्याचा एटीएसला संशय आहे. तसेच हिरेन यांना तावडे म्हणून फोन करणाराही शिंदे हाच असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी उभी करण्याच्या कटातही शिंदेच्या सहभागाबाबत तपास केला जात आहे. 

Edited By Rajanand More
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख