मराठा आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचे तळ्यात-मळ्यात

मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेतला आढावा
uddhav thackray-ajit pawar
uddhav thackray-ajit pawar

मुंबई : मराठा आरक्षणाच्या बाबत कोणताही ठोस निर्णय न घेता मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. मात्र राज्य सरकारने मराठा समाजासाठी घेतलेल्या विविध निर्णयांसह सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नोकरभरती प्रक्रियांच्या सद्यःस्थितीचा या मराठा आरक्षण विषय मंत्रिमंडळ उपसमितीने आढावा घेतला. (Maharashta Govt not decided to file repetition for Maratha Reservation)

सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सायंकाळी सह्याद्री शासकीय अतिथिगृह येथे झालेल्या या बैठकीला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

बैठकीनंतर माहिती देताना चव्हाण म्हणाले, ‘‘मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे रखडलेल्या नोकरभरती प्रक्रियेबाबत मुख्य सचिव विभागनिहाय आढावा घेत असून, पुढील दोन-तीन दिवसांत त्यांचा अहवाल अपेक्षित आहे. त्यानंतर या नोकरभरतीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा सखोल अभ्यास करून पुढील कायदेशीर पर्यायांबाबत शिफारस करण्यासाठी माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या विधीतज्ज्ञांच्या समितीचे कामकाज सुरू झाले आहे. येत्या ३१ मे पूर्वी त्यांचा अहवाल प्राप्त होणार आहे. त्यानंतर फेरविचार याचिका आणि इतर पर्यायांबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.’’

‘‘मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने २२ सप्टेंबर २०२० रोजी अनेक निर्णय घेतले होते. त्या निर्णयांच्या अंमलबजावणीचाही आजच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. मराठा समाजासाठी जाहीर झालेली शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती, वसतीगृह संदर्भातील सवलती यापुढेही सुरू राहील,’’ असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षणाबाबत भारतीय जनता पक्षाने स्थापन केलेल्या समितीबाबत एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, ‘‘ही समिती मराठा आरक्षण कसे टिकवावे, याबाबत काही सकारात्मक सूचना मांडण्यासाठी स्थापन झाली असावी असा आमचा समज होता. परंतु, ही समिती विधायक सूचना करण्यासाठी नव्हे तर, आंदोलने करण्यासाठी स्थापन झाल्याचे दिसून येते आहे. मराठा आरक्षणाबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सुनावला आहे. त्यामुळे भाजप नेमके कोणाविरुद्ध आंदोलन करते आहे? भाजपने राजकारण नव्हे तर सहकार्य करावे.’’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com