पोलिस दलात पुन्हा खांदेपालट..फडणवीसांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांवर कुऱ्हाड?. - Maharashtra Police major reshuffle at the IPS officer level again Dilip Walse Patil | Politics Marathi News - Sarkarnama

पोलिस दलात पुन्हा खांदेपालट..फडणवीसांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांवर कुऱ्हाड?.

उत्तम कुटे
शनिवार, 10 एप्रिल 2021

आयपीएस अधिकारी पातळीवर पुन्हा मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

पिंपरी : सचिन वाझे प्रकरणात पोलिस खात्याची झालेली बदनामी भरून त्यांची प्रतिमा सुधरवण्यास नवे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पदभार हाती घेताच  सुरुवात केली आहे. त्याचा प्रत्यय स्वच्छ आणि प्रामाणिक संजय पांडे यांच्याकडे राज्याच्या पोलिस प्रमुखपदाची अतिरिक्त जबाबदारी सोपवून त्यांनी दिला आहे. 

पोलिस खात्याचे  डँमेज कंट्रोल आणि इमेज बिल्डिंगचे नव्या गृहमंत्र्यांचे हे काम पुढेही सुरु राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. पांडेंसारख्या स्वच्छ अधिकाऱ्यांना महत्वाची पदे दिली जाणार असून तशी यादीही तयार झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

या खांदेपालटात मुंबई पोलिसांसह राज्य पोलिस दलात ज्येष्ठ आयपीएस अधिकारी पातळीवर पुन्हा मोठा बदल होण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांवर कुऱ्हाड येणार आहे. पदभार हाती घेतलेल्या दिवशीच वळसे यांनी तसे संकेत दिले होते. अधिकाऱ्यांच्या निष्ठा तपासणार आहे, असे ते त्यावेळी म्हणाले होते. 

दरम्यान, राज्यात सत्ताबदल होताच रश्मी शुकलांसारख्या फडणवीसांच्या गुड बुकातील अधिकाऱ्यांनी केंद्रात प्रतिनियुक्तीवर जाणे पसंत केले आहे. आता आणखी काही अधिकारी त्या मार्गावर जाण्याची शक्यता आहे. कारण नव्या बदलात त्यांना कमी महत्त्वाच्या जागी नियुक्ती मिळण्याचा दाट संभव आहे. कारण, ते सध्या असलेल्या क्रीम फिल्ड पोस्टिंगवर खराब झालेली पोलिसांची प्रतिमा सुधरवण्यासाठी स्वच्छ आणि प्रामाणिक अधिकारी दिले जाणार आहेत, अशी यादी तयार झाली असून तिला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही हिरवा कंदील दिल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

संजय पांडे यांना अखेर न्याय
सेवाकाळात अनेकदा महत्त्वाच्या पदांवर डावलले गेलेले ज्येष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे यांना अखेर न्याय मिळाला आहे. राज्य सरकारने त्यांची प्रभारी पोलिस महासंचालक (डीजीपी) म्हणून नेमणूक केली. याबाबतचा आदेश काल (ता.९) रात्री उशिरा गृह विभागाने काढला.  पांडेंना न्याय मिळाला असला तरी राज्याला, मात्र  कायमस्वरूपी डीजीपी मिळालेले नाहीत. गेल्या तीन महिन्यांत राज्याला लाभलेले पांडे हे तिसरे हंगामी पोलीस प्रमुख आहेत. सध्या मुंबईचे पोलिस आयुक्त असलेले हेमंत नगराळे हे या पदावर येण्यापूर्वी त्यांच्याकडे डीजीपी पदाची अतिरिक्त जबाबदारी होती. मात्र, गेल्या महिन्यात वाझे प्रकरणामुळे ज्येष्ठ आयपीएस अधिकारी पातळीवर खांदेपालट झाला. मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांची उचलबांगडी होमगार्ड महासंचालक म्हणून केली गेली. त्यांच्या जागी नगराळे आले तर, नगराळेंची अतिरिक्त डीजीपी पदाची जबाबदारी राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे म्हणजे एसीबीचे महासंचालक रजनीश शेठ यांच्याकडे देण्यात आली होती. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख