Maharashtra home minister anil deshmukh praises role of police in dharavi pattern | Sarkarnama

'धारावी पॅटर्न'मध्ये पोलिसांनी केलेल्या कामगिरीचा मला अभिमान : गृहमंत्री अनिल देशमुख 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 13 जुलै 2020

आपले राज्य, देश नव्हे तर संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या धारावी परिसरात कोरोना विरुद्धच्या सुरू असलेल्या युद्धात धारावीकरांची सरशी झाल्याने मोठा दिलासा मिळाला असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी एक नवा "धारावी पॅटर्न" समोर आला आहे.

मुंबई  :  धारावीत कोरोना नियंत्रणासाठी पोलीस यंत्रणेसोबत आरोग्य यंत्रणा, डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कामगार, या भागातील खासदार, आमदार, यांनी निश्चितच प्रयत्नांची पराकाष्ठा केली. म्हणून हे यश दृष्टिक्षेपात आले. या मोहीमेत पोलीस विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी देखील मौलिक कामगिरी केली, त्याचा आपल्याला अभिमान असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

कोरोना मुक्तीसाठी धारावी परिसरात झालेले शासन, प्रशासन आणि जनता यांचे एकत्रित प्रयत्न आणि त्यामुळे कमी होत असलेली कोरोना रुग्णांची संख्या याची जागतिक आरोग्य संघटनेने देखील दखल घेतली आहे, ही बाब निश्चितच मोठ्या प्रमाणात दिलासा देणारी आहे. या कामी अगदी सुरुवातीपासून पोलीस यंत्रणेने विविध माध्यमातून धारावीतील नागरिकांना जागृत केले, असून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे त्यांचाही मोठा वाटा या यशात आहे, असे देशमुख यांनी म्हटले आहे.

धारावी परिसरात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून पोलीस यंत्रणा तातडीने सतर्क झाली. अत्यंत दाट लोकवस्ती, अरुंद गल्ल्या, यातून केवळ एका वेळी एकच व्यक्ती जाऊ शकते अशी परिस्थिती, त्यामुळे सोशल डिस्टंसिंग पाळणे हे अत्यंत कठीण होते. त्यावर नियंत्रण करण्यासाठी पोलिसांनी विविध माध्यमातून जनजागृती सुरू केली. पोलिसांच्या गाडीतून ध्वनिक्षेपकद्वारे माहिती देणे. तसेच अत्याधुनिक अशा ड्रोन चा उपयोग करून त्यावरील ध्वनिक्षेपकद्वारे लोकांना माहिती देऊन जागृत करणे. या अत्याधुनिक ड्रोन मुळे जवळपास चार किलोमीटरचा परिसर कव्हर होत होता. तसेच काही प्रसंगी नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून, त्यांना कोरोनाचे दुष्परिणाम समजावून सांगणे, अशा प्रकारची कामे पोलिसांनी केली. तसेच कोरोना बद्दल काय दक्षता घ्यावी याची ऑडिओ क्लिप बनवून तिचे प्रसारण व्हाँट्सअप ग्रुप द्वारे, सामाजिक सुरक्षा अंतर राखून मीटिंग घेऊन त्याद्वारे, तसेच मंदिर, मशीद यातील ध्वनिक्षेपकाद्वारे लोकांपर्यंत ती क्लिप, त्यातील माहिती पोहोचविली. अरुंद गल्ल्यातून पायी गस्त घालून लोकांची जनजागृती केली.

कोरोना जनजागृती नंतर लोकांच्या दैनंदिन गरजांची पूर्तता करणे हेदेखील मोठे आव्हान शासन प्रशासनासमोर होते. त्या कामी देखील पोलिस विभागाने मोठी मदत केली. सर्व  दुकानदारांना बोलावून सोशल डिस्टंसिंग चे महत्व पटवून दिले व त्यानुसारच लोकांना त्यांनी किराणा, भाजीपाला द्यावा अशा स्पष्ट सूचना दिल्या, भाजीपाला मटन, चिकन यांची दुकाने मोकळ्या जागी हलवली. याचाही फायदा निश्चितच झाला. धारावीतील पंचवीस-तीस खानावळवाल्यांना बोलावून लोकांना घरपोच सेवा देण्याची व्यवस्था करण्याची सूचना केली. त्याचप्रमाणे या परिसरात सामाजिक संस्थांच्या माध्यमातून दररोज २५ ते ३० हजार लोकांना दोन वेळेस मोफत जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली. धारावी परिसरात मोठ्या प्रमाणात बिहारी लोक व्यवसायानिमित्त राहतात त्यांनाही त्यांच्या बिहारी जनता असोसिएशन मार्फत बोलावून सूचना व मदत केली. महत्त्वाचे म्हणजे पोलिसांनी धारावीच्या विविध भागातील प्रत्यकी २-२ स्वयंसेवकांना पोलीस स्टेशनला बोलावून त्यांना कोरोना बद्दलचे सविस्तर मार्गदर्शन केले व त्यांच्या मार्फत त्याच्या भागात गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात, लोकांची जनजागृती करण्यात यश मिळाले, असे गृहमंत्री देशमुख यांनी म्हटले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख