maharashtra health minister visited private hospitals in mumbai surprisingly
maharashtra health minister visited private hospitals in mumbai surprisingly

'बॉम्बे', 'हिंदुजा', 'लिलावती' हॉस्पीटलला कारणे दाखवा नोटीस

मंगळवारी पहाटे दोन वाजेपर्यंत आरोग्यमंत्री रुग्णालयातील खाटांच्या उपलब्धतेबाबत माहिती घेत होते.

मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा राज्य शासनाने ताब्यात घेतल्या आहेत. मात्र अद्यापही काही ठिकाणी रुग्णांना खासगी रुग्णालयांकडून अपेक्षित ते सहकार्य होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्याची दखल घेऊन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल रात्री मुंबईतील खासगी रुग्णालयांना अचानक भेटी दिल्या.

मंगळवारी पहाटे दोन वाजेपर्यंत आरोग्यमंत्री रुग्णालयातील खाटांच्या उपलब्धतेबाबत माहिती घेत होते.  रुग्णांना दिलेल्या खाटांची अचूक माहीती रुग्णालय प्रशासनाने जाहीर फलकावर द्यावी. राज्य शासनाच्या नियमांचे पालन केलेच पाहिजे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. दरम्यान, या भेटीमध्ये चारही रुग्णालयांमध्ये काही बाबींची अपूर्णता आढळून आल्याने राज्य आरोग्य सेवा हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी या रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 

कोरोना तसेच कोरोना शिवाय अन्य आजारांच्या रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू होऊ नये यासाठी राज्य शासनाने मुंबईसह राज्यातील खासगी रुग्णालयांच्या ८० टक्के खाटा ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातूनही रुग्णांना मोफत उपचाराचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रने घेतलेला हा अभिनव निर्णय अन्य राज्यांनाही प्रेरणादायी ठरला आहे. ८० टक्के खाटा राखीव करूनही रुग्णांना खाटा नाकारण्याचे किंवा बेड फुल झाल्याचे कारण खासगी रुग्णालयांकडून दिले जाते. यासंदर्भात रुग्णांच्या तक्रारी येत असून त्याची दखल घेत काल रात्री दहाच्या सुमारास आरोग्यमंत्र्यांनी खासगी रुग्णालयांना भेट देण्याचे मिशन हाती घेतले. त्यांच्या सोबत राज्य आरोग्य सेवा हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे होते. 

सुरूवातीला त्यांनी बॉम्बे हॉस्पीटलला भेट दिली. तिथे खाटांच्या उपलब्धतेबाबत जाहीर फलक नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त केली. रुग्णालयातील एकूण खाटा, ८० टक्केनुसार दिलेल्या खाटा, शिल्लक खाटा यांची माहिती त्यांनी घेतली. त्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी जसलोक, हिंदुजा, लिलावती या रुग्णालयांनाही भेटी दिल्या. प्रत्येक ठिकाणी त्यांनी राखीव खाटांची माहिती दर्शविणारा तक्ता पाहिला. रात्री दहाच्या सुमारास सुरू झालेली ही मोहिम पहाटे दोन पर्यंत सुरू होती. रुग्णांना खाटा नाकारू नका. त्यांना वेळेवर उपचार द्या. शासनाला सहकार्य करा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. काही रुग्णालयांमध्ये बेडच्या उपलब्धतेबाबत आणि दिलेल्या बेड बाबत माहिती दर्शविणारे फलक नव्हते, शासनाने उपाचारासाठी जे दर निश्चित केले आहेत ते दरपत्रक लावण्यात आलेले नव्हते. क्षमतेच्या ५० टक्केही खाटांचा वापर न करताही अनेक रुग्णांना प्रतिक्षा करावी लागत आहे अशी विविध बाबी या भेटी दरम्यान निदर्शनास आल्या. राज्य शासनाने कोरोना उपचारासाठी केलेल्या नियमांचे पालन न करण्यात आल्याने डॉ. सुधाकर शिंदे यांनी या बॉम्बे हॉस्पीटल, जसलोक हॉस्पीटल, हिंदुजा हॉस्पीटल, लिलावती हॉस्पीटल यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. राज्य शासनाने काढलेल्या आदेशाचे पालन न करणाऱ्या रुग्णालयांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही आरोग्यमंत्र्यांनी दिला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com