"मंत्रिमंडळात विरोध होत असला तरी परिस्थिती पाहून लॅाकडाउनचा निर्णय..." - maharashtra health minister rajesh tope on lowdown  | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

"मंत्रिमंडळात विरोध होत असला तरी परिस्थिती पाहून लॅाकडाउनचा निर्णय..."

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 30 मार्च 2021

परिस्थिती पाहून लॉकडाउनचा निर्णय घ्यावा लागेल," असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

मुंबई : "मंत्रिमंडळात विरोध होत असला तरी परिस्थिती पाहून लॉकडाउनचा निर्णय घ्यावा लागेल," असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

"अर्थचक्रही चाललं पाहिजे आणि जीवही वाचला पाहिजे, त्यामुळे मध्यबिंदू गाठावा लागतो आणि परिस्थितीनुसार योग्य निर्णय घ्यावा लागतो," असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

राजेश टोपे म्हणाले, "कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. काही शहरात बेड्स उपलब्ध नाहीत ही वस्तूस्थिती आहे. काही ठिकाणी रुग्णालयात बेड मिळतच नाही असं नाही. कालच्या बैठकीत खासगी रुग्णालयांमधील 80 टक्के बेड ताब्यात घेतले पाहिजे, ज्यामुळे बेड कमी पडणार नाही. 80 टक्के ऑक्सिजन सिलेंडर्सचा वापर मेडिकल कारणांसाठी केला जावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
 
सिनेमा, माँल अशी गर्दीची ठिकाणे संपूर्ण बंद करावी लागणार आहेत. विविध क्षेत्राचा अभ्यास करुन लॉकडाउनबाबत निर्णय घेतला जातो. परिस्थितीवर नजर ठेवून निर्णय होतो. निर्बंध अधिक कडक करावे लागतात. लोकांकडून प्रतिसाद मिळत नाही, जनतेचा बिनधास्तपणा कोरोना रुग्णवाढीला कारणीभूत आहे, नियम पाळल्यास लॅाकडाउनची वेळ येणार नाही, असे टोपे म्हणाले. 

पुणे जिल्ह्यात कालअखेरपर्यंत (ता.२९) एकूण ५९ हजार तीन सक्रिय कोरोना रुग्ण झाले आहेत. एकूण सक्रिय रुग्णांमध्ये पुणे शहरातील ३२ हजार ८७५ सक्रिय रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात काल दिवसभरात ४ हजार ९६१ नवे रुग्ण सापडले आहेत. दिवसांतील एकूण रुग्णांत पुणे शहरातील २ हजार ५४७ जण आहेत.

जिल्ह्यातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी १३ हजार ९५४ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार चालू आहेत. गेल्या चोवीस तासात ४ हजार ९५१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अन्य ३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ९ हजार ८७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल दिवसभरातील एकूण मृत्यूंमध्ये शहरातील सर्वाधिक २४ जण आहेत. काल २२ हजार ९४० कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. 

काल शहरातील सर्वाधिक रुग्णांपाठोपाठ पिंपरी चिंचवडमध्ये १ हजार ४७२,
जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ६५६, नगरपालिका क्षेत्रात २२४ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात ६२ रुग्ण सापडले आहेत. दिवसांतील एकूण कोरोनामुक्त रुग्णांमध्ये पुणे शहरातील २ हजार ७७१, पिंपरी चिंचवडमधील १ हजार ३१५, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ५३८, नगरपालिका हद्दीतील २४१ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ८६ जणांचा समावेश आहे. 

सद्यःस्थितीतील एकूण सक्रिय रुग्णांपैकी ४५ हजार ४९ जणांचे गृहविलगीकरण करण्यात आले आहे. सध्या विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये शहरातील ४ हजार ३४३, पिंपरी चिंचवडमधील २ हजार ८१६, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ४ हजार १५९, नगरपालिका हद्दीतील २ हजार ३०२ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ३३४ रुग्ण आहेत.
  Edited  by :  Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख