Maharashtra government issue orders regarding opposition leaders meeting | Sarkarnama

देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर यांनी बोलावलेल्या बैठकांना अधिकाऱ्यांनी जावू नये!

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 21 जुलै 2020

इतर संसद सदस्य, विधानमंडळ सदस्यांना त्यांच्या मतदारसंघातील कामासंदर्भात बैठक आयोजित करायची असेल तर ती बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करावी, असेही आदेशात म्हटले आहे. 

मुंबई: शासनाने मंत्र्यांचा दर्जा दिलेल्या व्यक्ती, संसद सदस्य, विधानमंडळ सदस्य यांनी आयोजित केलेल्या बैठकांना शासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे किंवा कसे, यासंदर्भाने राज्य शासनाने आज आदेश काढून मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर या विरोधी पक्षनेत्यांनी बैठक बोलावल्यास त्यासाठी अधिकाऱ्यांना उपस्थित राहता येणार नाही. 

भाजप सरकारने 11 मार्च 2016 रोजी अशाच पद्धतीचे परिपत्रक जारी करून शासकीय अधिकाऱ्यांनी विरोध पक्ष नेत्यांच्या बैठकांना हजर राहू नये, अशा सूचना केल्या होत्या. महाविकास आघाडी सरकारने भाजपच्या काळातील परिपत्रकाच्या आधारे आज जीआर जारी केला आहे. 

ज्या शासकीय समित्यांचे अध्यक्ष हे अशासकीय व्यक्ती, संसद सदस्य, विधीमंडळ सदस्य आहेत, अशा समितीच्या अध्यक्षांनी बोलावलेल्या बैठकीला संबंधित अधिकाऱ्यांना उपस्थित राहावे लागणार आहे. इतर संसद सदस्य, विधानमंडळ सदस्यांना त्यांच्या मतदारसंघातील कामासंदर्भात बैठक आयोजित करायची असेल तर ती बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करावी, असेही आदेशात म्हटले आहे. 

अधिकाऱ्यांना बोलावून त्यांना सूचनावजा आदेश देण्याचे अधिकार शासनाच्या मंत्र्यांना आहेत, मात्र असे अधिकार मंत्रीपदाचा दर्जा असलेल्या विरोधी पक्षनेत्यांना नाहीत, असेही या जीआरमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. 

अमित शाह यांनी हस्तक्षेप केल्यामुळे दिल्लीतील कोरोना आटोक्यात!

मुंबई: माजी मुख्यमंत्री आणि विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी चाचण्या वाढवण्याचा सल्ला दिला आहे. तसेच केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी हस्तक्षेप केल्यामुळे दिल्लीतील कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याचा दावा केला आहे. 

कोरोना चाचण्या सातत्याने कमी करण्यामुळे आपण काय कमाविले आणि काय गमाविले, असा सवाल करून फडणवीस यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातील संसर्गाचा दर अगदी प्रारंभी जो 6 ते 7 टक्के होता, तो 8 जूनपर्यंत 17-18 टक्क्यांवर आला आणि आता 23 ते 24 टक्के झाला आहे. अर्थात 100 चाचण्यांमधून 24 जणांना कोरोना निघतो. 

मुंबईचा संसर्गाचा दर 21 ते 27 टक्क्यांवर स्थिरावलेला आहे. चाचण्यांची संख्या अतिशय कमी आहे. 1 ते 19 जुलैच्या दरम्यानची सरासरी काढली तरी केवळ 5500 चाचण्या दररोज होत आहेत. नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी हस्तक्षेप केल्यानंतर आणि चाचण्यांची संख्या वाढविल्यानंतरची स्थिती फार सुधारलेली आहे. संसर्गाचा दर 30 ते 35 टक्क्यांहून आता 6 टक्क्यांवर आलेला आहे आणि कोरोना बळींच्या संख्येतही घसरण झालेली आहे. चाचण्यांची संख्या कमी न करता हे शक्य झालेले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख