रामदेवबाबांच्या 'त्या' औषधावर महाराष्ट्राचा गृह विभाग लक्ष ठेवणार! - Maharashtra food and drug minister dr rajendra shingane on coronil medicine | Politics Marathi News - Sarkarnama

रामदेवबाबांच्या 'त्या' औषधावर महाराष्ट्राचा गृह विभाग लक्ष ठेवणार!

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 4 जुलै 2020

या औषधामुळे कोरोना बरा होतो असा संभ्रम जनतेमध्ये निर्माण करुन त्यांची दिशाभूल होत आहे.

मुंबई : पतंजलीने बाजारात आणलेल्या कोरोनील नावाच्या औषधाने कोरोना बरा होत नाही. पतंजलीने या औषधामुळे कोरोना बरा होतो असा जनतेत संभ्रम निर्माण केल्यास अथवा जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यास गृह विभागाच्या मदतीने औषधे व जादूटोणादी उपाय (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा 1954 नुसार कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिला आहे.

या औषधामुळे कोरोना बरा होतो असा संभ्रम जनतेमध्ये निर्माण करुन त्यांची दिशाभूल होत आहे. प्रत्यक्षात पतंजलीने तयार केलेले औषध कोरोनील हे अश्वगंधा, तुळस व गुळवेल वापरून तयार केलेली गोळी (tablet) असून तिचा उपयोग रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी होतो. आयुष मंत्रालयाने सुद्धा रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी वरील औषधाची अश्वगंधा, तुळस, गुळवेल हे घटक समाविष्ट असल्याने शिफारस केली आहे. प्रत्यक्षात यामुळे कोरोना बरा होत नाही.

कोरोनील हे औषधासाठी दिलेले नाव (कोरोना+निल) व प्रसार माध्यमातून होत असलेल्या जाहिरातींमुळे जनतेची दिशाभूल व संभ्रम निर्माण होत आहे. कोरोनीलचा वापर फक्त रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे औषध म्हणून केला जाऊ शकतो. या औषधामुळे कोरोना बरा होत नाही याची नोंद जनतेने घ्यावी, असे आवाहन डॉ. शिंगणे यांनी केले आहे.

आदित्य ठाकरे 'कोरोना' रूग्णांच्या मदतीला धावले

जळगाव : जिल्ह्यासह शहरात 'कोरोना'चा संसर्ग वाढतो आहे, त्यामुळे अधिक व्हेंटीलेटरचीही आवश्‍यकता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे जिल्ह्याच्या मदतीला धावून आले. त्यांनी शहर व जिल्ह्यासाठी पाच ऑक्‍सीजन कॉन्सट्रेटर उपलब्ध करून दिले आहेत, हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी ते लावण्यात येणार आहेत.

जळगाव जिल्ह्यात 'कोरोना'चा संसर्ग अधिक वाढत आहे. तब्बल चार हजार सात कोरोनाचे पॉझीटीव्ह रूग्ण आहेत. 1271 रूग्ण उपचार घेत आहेत. तर 250 जणांचे निधन झाले आहे. जिल्ह्यातील ही परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी शासकीय पातळीवर उपाययोजना करण्यात येत आहे.  जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे या परिस्थितीवर नियत्रंण करण्यासाठी स्थानिक स्तरावर अधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत तर राज्य स्तरावरून उपचारासाठी अधिक उपायोजना करण्यासाठी प्रयत्नही करीत आहेत. मात्र अशा स्थितीत सामाजिक संस्थाकडूनही मदत घेण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यातील ही परिस्थिती लक्षात घेवून पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी जळगाव जिल्ह्यासाठी तातडीने पाच ऑक्‍सीजन कॉन्सट्रेटर उपलब्ध करून दिले आहेत.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख