गुढीपाडवा झाला की 15 दिवसांचा कठोर लाॅकडाऊन : निर्णय पुढील 24 तासांत

टास्क फोर्समध्ये किती दिवसांचा लाॅकडाऊन यावरूनदोन गट
uddhav mantarlay
uddhav mantarlay

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोना स्थितीविषयी टास्क फोर्स, आरोग्यमंत्री तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी लाॅकडाऊन संदर्भात चर्चा सुरू केली. हा निर्णय आता सोमवारी होण्याची शक्यता असून गुढीपाडव्यानंतर राज्यात कठोर लाॅकडाऊन लागण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर नेत्यांची सोमवारी सकाळी पुन्हा चर्चा झाल्यानंतर लाॅकडाऊनचा निर्णय होणार आहे.

अचानक लाॅकडाऊन जाहीर करण्यापेक्षा नागरिकांना वेळ द्यावा, असे सांगण्यात आले तर तज्ञांनी तो तातडीने म्हणजे 12 एप्रिलपासूनच लागू करावा, असा आग्रह धरला. लाॅकडाऊन सात दिवसांचा की पंधरा दिवसांचा यावरही बैठकीत दोन गट पडले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह इतर काही हे किमान पंधरा दिवसांचा लाॅकडाऊन केल्याशिवाय कोरोनाची साखळी तुटणार नसल्याच्या मताचे होते. इतरांनी सात दिवसांचा लाॅकडाऊन उपयुक्त ठरेल असे मत व्यक्त केले. तरी पंधरा दिवसांचाच लाॅकडाऊन जाहीर होण्याची जास्त शक्यता आहे. गुढीपाडवा, आंबेडकर जयंती, रमझान ईद असे सण या महिन्यात असल्याने बाजारपेठेत मोठी गर्दी होण्याचा धोका आहे. त्यामुळे त्या आधीच लाॅकडाऊन जाहीर करावा, असेही मत व्यक्त झाले.

या वेळी टास्क फोर्सने राज्य सरकारला काही उपयुक्त सूचना केल्या असून त्यात ९५ टक्के रुग्ण हे घरीच योग्य रीतीने उपचार घेऊन बरे होऊ शकतात याबाबत टास्क फोर्सने विश्वास व्यक्त केला. केवळ गंभीर स्वरूपाच्या रुग्णांनाच तातडीने रुग्णालयाची गरज भासते. त्यादृष्टीने जनजागृती करावी, सोसायट्यांमध्ये विलगीकरण कक्ष करून तिथे ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स लावून तात्पुरती गरज भागवावी, मुंबई पालीकेसारखी वॉर्ड वॉर रुमच्या माध्यमातून बेड्सचे उत्तम व्यवस्थापन करावे, डॉक्टरांनी आलेल्या रुग्णाला सहा मिनिटे `वॉक टेस्ट` करून घ्यावी मगच निर्णय घ्यावेत, तरुण रुग्णांना देखील व्हेंटीलेटर्सची आवश्यकता पडू लागली आहे त्याचे नियोजन करावे, ऑक्सिजन देताना तो सुयोग्य आणि आवश्यकतेपेक्षा जास्त न दिला पाहिजे यासाठी डॉक्टर्सना सुचना देणे, मास्क न लावल्यास किंवा इतर नियम तोडल्यास मोठा दंड आकारणे एमबीबीएसच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्याचा, आयुष डॉक्टर्सचा  मोठ्या प्रमाणावर  उपयोग करून घेणे आदि सुचना करण्यात आल्या


कोविडच्या मोठ्या लाटेला थोपविण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतरच्या काळात ऑक्सिजन प्लॅन्टची उभारणी, बेड्स व इतर वैद्यकीय सुचिधा वाढवणे, रेमडीसीव्हीर उपलब्ध करणे, लसीकरण वाढवणे व विशेषत: सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देणे यादृष्टीने तत्काळ कार्यवाही व्हावी असे सांगतांना लसीकरण वाढविण्यासाठी महाराष्ट्राला अधिक लसींचा पुरवठा व्हावा अशी विनंती परत एकदा आपण पंतप्रधानांना करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, टास्क फोर्सचे डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी. डॉ अविनाश सुपे, डॉ उडवाडिया, डॉ वसंत नागवेकर, डॉ राहुल पंडित, डॉ झहीर विराणी, डॉ ओम श्रीवास्तव, डॉ तात्याराव लहाने, आरोग्य प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरव उपस्थित होते.

एसओपी तयार करणे सुरु  

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या वर्षभरापासून आपण कोविड्शी लढा देताना सुविधा वाढविल्या, चाचण्या वाढवल्या, मोठ्या प्रमाणावर आरोग्याचे नियम पाळावेत यादृष्टीने जनजागृती केली, लोकांमध्ये सुद्धा याविषयी जागरूकता आली आहे.  कार्यालयीन वेळांमध्ये बदल करावेत, वर्क फ्रॉम होमवर भर द्यावा, मुंबईत उपनगरीय रेल्वेसाठी पिक अवर्स ठरवणे अशा अनेक मुद्द्यांवर आपण बोललो आणि कार्यवाही केली आहे. मुळात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. लक्षणे नसलेल्या व्यक्ती लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संसर्ग पसरवित आहेत. जे लोक आरोग्याचे नियम पाळत आहेत त्यांना निष्काळजी लोकांमुळे करण नसतांना धोका निर्माण झाला असून लॉकडाऊन लावून ही वाढ थोपवावी असे त्यांचे म्हणणे आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून यासंदर्भात सर्वसमावेशक कार्य पद्धती ( एसओपी ) तयार करण्यात येईल.

आता आपण लसीकरणात पुढे आहोत मात्र आणखीही गती वाढवू आणि जास्तीत जास्त जणांना लस देऊत पण हे लसीकरण आगामी काळात येणाऱ्या तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी उपयुक्त ठरेल , आत्ता या क्षणी असलेल्या लाटेला थांबविण्यासाठी आपल्याला कडक निर्बंध काही काळासाठी का होईना लावावेच लागतील असेही मुख्यमंत्री म्हणाले.

रेमडीसीव्हीरचा अवाजवी वापर थांबिण्यावर चर्चा    

आजच्या बैठकीत गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश तसेच ज्या ठिकाणी ऑक्सिजन मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो तेथून ऑक्सिजन तातडीने मागविण्याची कार्यवाही करावी यावरही चर्चा झाली.  रेमडीसीव्हीरचा अति व अवाजवी वापर थांबविणे देखील गरजेचे आहे असे मत टास्क फोर्सने व्यक्त केले.

यावेळी आरोग्यमंत्री डॉ टोपे यांनी देखील बोलताना अ[पण रेमडीसीव्हीरचा पुरवठा किरकोळ विक्रेत्यांकडून न होता ते ठोक विक्रेत्याने थेट रुग्णालयास देणे,  रेमडीसीव्हीरसंदर्भात डॉक्टरकडून फॉर्म भरून घेणे, केंद्र सरकारच्या समन्वयाने पुरवठा वाढविणे यावर कार्यवाही झाली आहे अशी माहिती दिली.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com