सरकार कोसळण्याच्या धास्तीने लोकल बंद! मनसेचा आरोप

मनसेच्या आंदोलनाने धास्तावलेल्या पोलिस प्रशासनाने रेल्वेस्थानक परिसरात बंदोबस्त तैनात केला होता.
सरकार कोसळण्याच्या धास्तीने लोकल बंद! मनसेचा आरोप

ठाणे : कोरोनाचा उद्रेक होऊन सरकार पडेल. या धास्तीनेच सर्वसामान्यांसाठी लोकल बंद ठेवल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे. 

कोव्हिड प्रादुर्भावामुळे गेले सहा महिने बंद असलेली लोकल उपनगरी सेवा सर्वसामान्यांसाठी खुली करावी, या मागणीसाठी सोमवारी ठाण्यात मनसेने सविनय कायदेभंग आंदोलन हाती घेतले; मात्र नौपाडा पोलिसांनी जाधव यांना ताब्यात घेतले; तर गनिमी काव्याने काही मनसैनिकांनी ठाणे ते मुलुंड लोकल प्रवास केला.

दरम्यान, मनसेच्या आंदोलनाने धास्तावलेल्या पोलिस प्रशासनाने रेल्वेस्थानक परिसरात बंदोबस्त तैनात केला होता. रेल्वे पोलिस आणि आरपीएफचे जवान ठाणे स्थानकात पहारा देऊन परवानगी असलेल्यांनाच सोडत होते.

मुंबईची जीवनवाहिनी असलेली उपनगरी सेवा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वसामान्यांसाठी बंद आहे. ठाणे-मुंबईच्या उपनगरांतून दररोज लाखो चाकरमानी नोकरी आणि कामानिमित्त मुंबईकडे प्रवास करतात; परंतु कोरोनाच्या महामारीमुळे हीच लोकल गेले सहा महिने बंद असल्याने नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

आठ तासांच्या नोकरीसाठी तेवढाच वेळ बस वा अन्य प्रवासासाठी खर्ची पडतो. तेव्हा लोकल सेवा सर्वांसाठी खुली करावी, या मागणीसाठी मनसेतर्फे सविनय कायदेभंग करून लोकल प्रवासाचे आंदोलन छेडण्यात आले; मात्र नौपाडा पोलिसांनी अविनाश जाधव यांना ताब्यात घेत आंदोलन मोडीत काढले; परंतु काही मनसैनिकांनी दुसऱ्या वाटेने जाऊन रेल्वेचा प्रवास करीत कायदेभंग केला.

या वेळी बोलताना जाधव यांनी एसटी आणि इतर बस सेवा सुरू असल्याने फक्त लोकल सेवाच बंद का ठेवण्यात आली, असा सवाल केला. कोरोना संकटात परिस्थिती नीट न हाताळल्याने महाविकास आघाडी सरकार पडेल, अशी भीती वाटल्यानेच लोकल बंद ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com