राठोडांचा राजीनामा घेतला मग देशमुखांचा कधी? संजय राऊत म्हणतात... - Letter Bomb MP Sanjay Raut criticise Opposition leaders | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राठोडांचा राजीनामा घेतला मग देशमुखांचा कधी? संजय राऊत म्हणतात...

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 22 मार्च 2021

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात संजय राठोड यांना वनमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.

मुंबई : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात संजय राठोड यांना वनमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनीही गंभीर आरोप केले आहेत. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राठोडांचा राजीनामा घेतला मग देशमुखांचा राजीनामा का नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यावर शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी या दोन प्रकरणांची तुलना करू नका, असे म्हटले आहे.

परमबीर सिंग यांच्या गंभीर आरोपांनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. याविषयी बोलताना राऊत म्हणाले, संजय राठोड आणि देशमुखांची तुलना करू नका. राठोड यांच्याविरोधात कुठलाही गुन्हा नाही. पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनीही राठोडांवर आरोप केले नाहीत. तरीही त्यांचा राजीनामा घेतला आहे. राष्ट्रवादी प्रमुखांनी जर देशमुखांवर झालेल्या आरोपांची चौकशी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली असेल तर त्यात चुक काय आहे? असे आरोप देशातील अनेक नेत्यांवर झाले आहेत.  

हेही वाचा : मुख्यमंत्री घेणार आज महत्वाची बैठक - राजकीय घडामोडींना वेग

भाजपवरच बुमरँग होईल

देशमुख यांचे काय होणार हा महाराष्ट्र आणि देशापुढील गंभीर प्रश्न नाही. परमबीर सिंग यांच्यावर आरोप करणारे विरोधकांना आज त्यांच्यावरच जास्त विश्वास ठेवून तोफा डागत आहेत. हे त्यांच्यावरच बुमरँग होईल. परमबीर हे विरोधकांचे महत्वाचे हत्यार बनले आहेत. देशमुखांनी आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. सरकार जर चौकशीचे आव्हान स्वीकारत आहे तर राजीनाम्याची मागणी का? मुख्यमंत्री याविषयी निर्णय घेतील, असे राऊत यांनी स्पष्ट केले. 

सरकारच्या केसालाही धक्का लागणार नाही 

केंद्रीय तपास यंत्रणांचा अतिरेकी वापर करून राष्ट्रपती राजवटीचे स्वप्न विरोधक पाहत आहेत. त्यांनी झोपेतून जागे व्हावे. कितीही प्रय़त्न केले तरी त्यांचे डावपेच यशस्वी होणार नाहीत. महाविकास आघाडी सरकारच्या केसालाही धक्का लागणार नाही. हे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. सरकारच्या प्रतिमेला तडा जाऊ नये यासाठी सगळेच प्रयत्न करत आहेत. विरोधकांनी किंवा एखाद्या अधिकाऱ्याने आरोप केले म्हणजे तडा जात नाही. पत्र हे पुरावा असु शकत नाही, असेही राऊत म्हणाले.

तपास यंत्रणांची मुख्यालयेच मुंबईत आणा

महाराष्ट्राचा अवमान करायचा असेल तर तपसा यंत्रणांनी दिल्लीतील मुख्यालये मुंबईत आणावीत. सरकार बीकेसीमध्ये चांगली जागा देईल.. सरकारचे हात स्वचछ आहेत. यापुढे आरोपांना उत्तरेही देणार नाही. राज्याच्या जनतेला कळून चुकले आहे की, विरोधकांना सरकारची प्रतिमा मलिन करायची. तपास यंत्रणांना जबरदस्तीने महाराष्ट्रात घुसवायचे. हा महाराष्ट्राच्या अधिकारावर घालाच आहे. महाराष्ट्राचा अवमान सहन करणार नाही.

Edited By Rajanand More

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख