leader of opposition pravin darekar criticizes state government | Sarkarnama

स्वत:चे अपयश झाकण्यासाठीच राज्य सरकारकडून विरोधी पक्षांची मुस्कटदाबी!

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 21 जुलै 2020

विरोधी पक्षनेते फक्त आरोप करत नाही तर फिल्डवर जावून माहिती घेतात, अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतात, हे जनतेने पाहिले आहे. त्यातून सरकारची नामुष्की चव्हाट्यावर आली.

मुंबई: कोविडच्या संकटकाळात विरोधी पक्षांनी आपली जबाबदारी चोख पार पाडल्याने सरकारवर नामुष्कीची वेळ आली आहे. त्यामुळे स्वत:चे अपयश झाकण्यासाठी सरकारकडून विरोधी पक्षांची मुस्कटदाबी केली जात असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे.

राज्य शासनाने आज आदेश काढून विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकांना शासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित राहू नये, असे म्हटले आहे. यापार्श्वभुमीवर प्रविण दरेकर यांनी या निर्णयावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, लोकशाहीने विरोधी पक्षनेतेपदाला दिलेल्या अधिकारांना मर्यादा आणण्याचं काम सरकार करत आहे. राज्य सरकारने कोविड संकटाकडे गांभिर्यानं लक्ष द्यायला पाहिजे होते, मात्र संबंधित विभागाचे मंत्री, जिल्ह्यांचे पालकमंत्री यांनी अपेक्षित नियोजन केलं नाही. कोविडला घाबरून त्यांनी बैठका घेतल्या नाहीत. यापार्श्वभुमीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व मी राज्यभर दौरे केले. कोविड सेंटर्स, हॉस्पटलला भेटी दिल्या. तिथे चर्चा करून उपाययोजना सुचवल्या, तसेच शहरांची यंत्रणा गतिमान केली. सरकारलं आपलं काम जमलं नाही, सरकार जिथे पोहचू शकलं नाही, तिथे आम्ही काम करण्याचा प्रयत्न केला. तिथे काही आम्ही आदेश दिले नव्हते. आमची माहिती अधिकाऱ्यांसमोर ठेवली होती. ती माहिती सरकारला पाठवून मार्ग काढा, असे त्यांना सांगितले होते. यामुळे जनतेच्या मनात विरोधी पक्षनेते आणि विरोधी पक्षाबद्दल सहानुभुतीचं वातावरण तयार झालं. विरोधी पक्षनेते फक्त आरोप करत नाही तर फिल्डवर जावून माहिती घेतात, अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतात, हे जनतेने पाहिले आहे. त्यातून सरकारची नामुष्की चव्हाट्यावर आली. त्यामुळेच त्यांनी विरोधी पक्षनेत्यांवर निर्बंध टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी काहीही केलेतरी आम्ही आमचे काम करतच राहणार आहोत, असे दरेकर यांनी म्हटले आहे.

बैठकीबाबात अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना

मुंबई: शासनाने मंत्र्यांचा दर्जा दिलेल्या व्यक्ती, संसद सदस्य, विधानमंडळ सदस्य यांनी आयोजित केलेल्या बैठकांना शासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे किंवा कसे, यासंदर्भाने राज्य शासनाने आज आदेश काढून मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर या विरोधी पक्षनेत्यांनी बैठक बोलावल्यास त्यासाठी अधिकाऱ्यांना उपस्थित राहता येणार नाही. 

भाजप सरकारने 11 मार्च 2016 रोजी अशाच पद्धतीचे परिपत्रक जारी करून शासकीय अधिकाऱ्यांनी विरोध पक्ष नेत्यांच्या बैठकांना हजर राहू नये, अशा सूचना केल्या होत्या . महाविकास आघाडी सरकारने भाजपच्या काळातील परिपत्रकाच्या आधारे आज जीआर जारी केला आहे. 

Edited by swarup jankar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख