अन् मुख्यमंत्री देखील यावर काही बोलत नाहीत!

मोफत लस संदर्भात महाविकास आघाडीमध्ये एक वाक्यता नाही.
  Uddhav Thackeray .jpg
Uddhav Thackeray .jpg

मुंबई : राज्यातील नागरिकांना कोविडची मोफत लस देण्याच्या श्रेयासाठी महाविकास आघाडीमधील पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी याबाबतची घोषणा करताच युवा सेनेचे प्रमुख आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी त्याबाबतचे ट्विट केले होते. मात्र, काही वेळातच ते ट्विट डिलिट केले. त्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

प्रवीण दरेकर म्हणाले की "मोफत लस संदर्भात महाविकास आघाडीमध्ये एक वाक्यता नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात ज्यांची ऐपत आहे त्यांनी लस विकत घ्यावी आणि गरिबांना मोफत देऊ, तर दुसरीकडे अल्पसंख्याक मंत्री नबाव मलिक आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात मोफत लस देण्यात यावी, अशी मागणी करतात''.

''दुसरीकडे राज्याचे पर्यावरम मंत्री अदित्य ठाकरे सुद्धा मोफत लसी संदर्भात ट्विट करतात व थोड्यावेळात ते डिलिट करतात. कुठेतरी हे तीन पक्षाचे सरकार आहे. त्याच्यातील त्याच्यात कुठेही एक वाक्यता दिसून येत नाही. फक्त कुठे तरी श्रेय वाद दिसत आहे. मुख्यमंत्री देखील यावर काही बोलत नाही'', असे दरेकर यांनी म्हटले आहे. 

मुंबईमध्ये लस उपलब्ध असतांनाही अनेक लसीकरण केंद्र बंद करण्यात आली. लस उपलब्ध असून ही केंद्र सरकार विषयी लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी हे केले, असल्याचा आरोप दरेकर यांनी केला. त्यांनी यावेळी महापालिका आयुक्त यांच्यावरही निशाणा साधला ते म्हणाले आयुक्तांनी असे वागता कामा नये, त्यांनी स्वतःला राजकारणापासून दुर ठेवले पाहिजे. 

दरम्यान, राज्यात लसीचा तुटवडा असताना अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राज्यातील सर्व नागरिकांना १ मे पासून मोफत लस देण्यात येणार आहे, त्याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळात चर्चा झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी तातडीने ट्विट करत राज्यातील नागरिकांना आम्ही आमचे कर्तव्य म्हणून मोफत लस देणार आहोत, असे म्हटले होते. मात्र, काही वेळानंतरच त्यांनी आपले ट्विट डिलिट केले होते. त्यावरून आदित्य ठाकरे यांच्यावर भापजच्या नेत्यांनी टिकेचे बाण सोडले आहेत.

राज्यामध्ये मोफत लसीकरणाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर करण्याआधीच त्याचे श्रेय घेणे योग्य नाही. अशा प्रकारच्या श्रेय घेण्याच्या प्रकारावर काँग्रेसची नाराजी आहे, असे थोरात यांनी म्हटले होते.

मोफत लसीकरणाबाबतची आमची भूमिका स्पष्ट आहे. आमच्या नेत्या सोनिया गांधी यांनी मोफत लसीकरण करण्याचा आग्रह धरला आहे. नागरिकांना कोरोना लस मोफत द्यावी अशी आमची आग्रही मागणी आहे. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे तसी मागणी केली असून ती मान्य होईल, अशी आशा आहे, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला होता.

 Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com