पडळकरांना जाब विचारता; मग गायकवाडांना मोकळे का सोडता! - Leader of Opposition in the Legislative Council Praveen Darekar criticizes Sanjay Raut | Politics Marathi News - Sarkarnama

पडळकरांना जाब विचारता; मग गायकवाडांना मोकळे का सोडता!

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 1 जुलै 2021

संजय राऊत यांच्या भूमिका संदर्भानुसार बदलत असतात

बुलडाणा : बुलडाणा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी ऍट्रॉसिटी कायद्याबद्दल वादग्रस्त विधान करुन, विधानसभा अधिवेशनाच्या तोंडावर वाद ओढवून घेतला आहे. त्यांनी ऍट्रॉसिटी बाबत धक्कादायक वक्तव्य केल्याचा एक व्हीडिओ नुकताच समोर आला आहे. त्यावरुन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी गायकवाड यांच्यावर टीका केली. (Leader of Opposition in the Legislative Council Praveen Darekar criticizes Sanjay Raut) 

दरेकर म्हणाले, संजय गायकवाड प्रसिद्धीसाठी असे बोलत असतात. भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) बोलल्यावर त्यांना जाब विचारला जातो, पण हे आमदार बोलले तर त्यांना कोणी काही बोलत नाही. त्यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी दरेकर यांनी केली.  

हेही वाचा : शरद पवार सरकारवर अंकुश ठेवण्यात कमी पडले: चंद्रकांत पाटील

राज्यापाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणुक घेण्याची सुचना केली. त्या विषयी विचारले असता दरेकर म्हणाले, एखादया विषयचे निवेदन राज्यपालांना आले तर लगेच राज्यपाल ते पुढे पाठवतात, त्यात काही गैर नाही. मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यायला हवा.  

यावेळी दरेकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की ''संजय राऊत यांच्या भूमिका संदर्भानुसार बदलत असतात. त्यांनी आपल्या बदलत्या भूमिकांचा पूर्व इतिहास बघिल्यानंतर त्यांना महाभारताचे दाखले देण्याची गरज पडत आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती. आता ती आघाडी विस्कळीत होण्याच्या टप्प्यावर असताना आपली भूमिका कशी योग्य आहे, आणि भाजप चुकीचे आहे, हे दाखवण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न होत आहे.      

दरम्यान, गायकवाड यांनी खामगाव तालुक्यातील चितोडा अंबिकापूर या गावातील दोन समाजातील कौटुंबिक वाद झालेल्या कुटुंबाला बुधवारी भेट दिली. दोन कुटुंबात आपसी वाद निर्माण झाला होता. या वादात गावातील घर व वाहनांची जाळपोळ व तोडफोड करण्यात आली होती. त्यामुळे पीडित वाघ कुटुंबियांना भेट देण्यासाठी गायकवाड यांनी शेकडो समर्थकांनसह गाड्यांच्या ताफ्या सोबत भेट देऊन परिस्थितिची पाहणी केली. मात्र, यांनतर त्यांनी तेथील गावकऱ्यांशी बोलतांना वादग्रस्त व चिथावणीखोर विधान केले.

हेही वाचा : पुलाच्या उद्घाटनावरुन सत्ताधारी भाजप अन् राष्ट्रवादी आमनेसामने

यावेळी बोलतांना गायकवाड म्हणाले की, या गावामध्ये बिहार आणि उत्तर प्रदेशला लाजवेल अशा प्रकारचा हल्ला झाला आहे. मला मातोश्रीवरून फोन आला की गावामध्ये जा आणि तेथील लोकांना धीर द्या. म्हणून मी इथे आलो आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी देखील पोलिसांशी चर्चा केली आहे. ऍट्रॉसिटी हा कायदा रक्षणासाठी आहे. मात्र, अनेक ठिकाणी पैसे वसुल करण्यासाठी आणि धमकी देण्यासाठी या कायद्याचा वापर केला जातो. डॅा. बाबासाहेब आंबेडकरांना असा समाज अपेक्षीत नव्हता. 

विनाकारण ऍट्रॉसिटीची केस दाखल केली तर तुम्हीही त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करा. घराच्या आणि जमिनीच्या वादात ऍट्रॉसिटीची केस होत नाही. हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. जर विनाकारण कोणी वाद निर्माण करत असेल तर मी १० हजारांची फौज घेऊन येतो आणि सगळ्यांना सरळ करतो. मला सांगा मी सगळीच ताकद द्यायला तयार आहे. माझ्याकडे अस्त्र शस्त्रांची ताकद आहे. सगळ्यांनी व्यवस्थीत रहा, कोणावर अन्या करुन नका पण, अंगावर आला तर त्याला शिंगावर घ्या, असे गायकवाड म्हणाले आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख