सोमय्यांच्या आंदोलनात केवळ ३० कार्यकर्ते  - Kirit Somaiya allegations against Chief Minister Uddhav Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

सोमय्यांच्या आंदोलनात केवळ ३० कार्यकर्ते 

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोंडीत पकडण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या मागील तीन-चार महिन्यांपासून प्रयत्न करत आहेत.

अलिबाग : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोंडीत पकडण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या मागील तीन-चार महिन्यांपासून प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्‍मी ठाकरे यांच्या मुरूड तालुक्‍यातील जमीन अपहाराचे प्रकरण उघडकीस आणून राज्य सरकारला अडचणीत आण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाची धार मात्र, आता बोथट झाली आहे. अलिबागमध्ये बुधवारी झालेल्या आंदोलनासाठी पुढाऱ्यांसह केवळ ३० कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी सोमय्या यांनी पोलीसांना जिल्हाधिकाऱ्यांना भेटू देण्याची विनंती केली. मात्र, पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याची परवानगी नाकारली. त्यामुळे आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या रस्त्यावर बसून महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. व आंदोलन कार्यकर्त्यांनी आंदोलन आटोपते घेतले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्‍मी ठाकरे यांनी २०१४ मध्ये मुरूड तालुक्‍यातील कोर्लेई येथे १९ घरांची खरेदी केली; मात्र सहा वर्षे ती नावावर केली नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बेनामी संपत्तीच्या व्यवहारात सहभागी होते, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

या जमीन व्यव्हाराची चौकशी झाली पाहिजे, ठाकरे चौकशीला का घाबरत आहे, असा सवाल सोमय्या यांनी केला. आंदोलनावेळी सोमय्यांसह भाजपाचे जिल्हाध्यक्ष महेश मोहिते, अलिबाग तालुकाध्यक्ष परशुराम म्हात्रे व इतर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांना अलिबाग पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

सोमय्या यांनी आठ तास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. कार्यालयासमोर रात्रभर आंदोलन करणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितेल होते. मात्र, त्यांना आठ वाजेच्या सुमारास पोलिसांनी ताब्यात घेतले. 

मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचे प्रयत्न 

अन्वय नाईक यांच्याकडून रश्‍मी ठाकरे तसेच मनीषा रवींद्र वायकर यांनी कोर्लेई येथील जमीन खरेदी केली होती. या जमिनीवर १९ घरे आहेत. त्याचे एकूण बांधकाम २३ हजार ५०० चौरस फूट आहे. रेडी रेकनरप्रमाणे त्याचे मूल्य पाच कोटी २९ लाख रुपये आहे. या व्यवहारात मोठा अपहार झाल्याचा आरोप करीत सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

Edited By - Amol Jaybhaye  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख