करण जोहरच्या त्या पार्टीचा सुशांतप्रकरणाशी संबंध नाही ! - Karan Johar's party has nothing to do with Sushant case! | Politics Marathi News - Sarkarnama

करण जोहरच्या त्या पार्टीचा सुशांतप्रकरणाशी संबंध नाही !

सरकारनामा ब्युरो
रविवार, 27 सप्टेंबर 2020

धर्मा प्रोडक्‍शनशी संबंधित धर्माटिक एण्टरटेन्मेंट कंपनीचा माजी कर्मचारी असलेल्या क्षितीज रवी प्रसादला ड्रग्सप्रकरणी एनसीबीने अटक केली होती.

मुंबई : बॉलीवूड ड्रग्स कनेक्‍शनप्रकरणी तपास करणाऱ्या केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अटक केलेल्या क्षितीज प्रसाद याला कुठून ड्रग्सचा पुरवठा होत होता हे समोर आले आहे. करमजीत सिंग व अंकुश अरनेजामार्फत क्षितीज प्रसाद यांना ड्रग्स मिळत होते. सुशांत सिंगपर्यंत पोहोचणारे ड्रग्सही याच करमजीत सिंगकडूनच यायचे.

धर्मा प्रोडक्‍शनशी संबंधित धर्माटिक एण्टरटेन्मेंट कंपनीचा माजी कर्मचारी असलेल्या क्षितीज रवी प्रसादला ड्रग्सप्रकरणी एनसीबीने अटक केली होती. निर्माता करन जोहर याने यापूर्वीच पत्रक जारी करून आपला क्षितीजशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. रविवारी आरोपीला याप्रकरणी सहा दिवसांची एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे.

तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी अटक करण्यात आलेला व्यावसायिक व ड्रग्स वितरक अंकुश अरनेजाच्या माहितीवरून 25 सप्टेंबरला एनसीबीने क्षीतीजच्या अंधेरी चार बंगला परिसरातील घरात छापा टाकला होता. त्या वेळी एनसीबीला गांजा ओढण्यासाठी वापरण्यात येणारा रोल सापडला होता. त्याशिवाय काही कागदपत्रे व इलेक्‍ट्रॉनिक वस्तू एनसीबीने जप्त केल्या. तो याप्रकरणी अटक आरोपी अंकुश अरनेजाकडून हशीश खरेदी करायचा. 

याशिवाय याप्रकरणी अटक आरोपी एक वितरक करमजीत सिंग ऊर्फ केजे याच्याकडूनही क्षितीजला ड्रग्स मिळत होते. करमजीतचा साथीदार संकेत पटेल याच्यामार्फत हे ड्रग्स पोहोचवले जायचे. पटेलच्या जबाबानुसार त्याने क्षितीजला मे ते जुलै 2020 या कालावधीत त्यांच्या इमारतीखाली 12 वेळा वीड (गांजा) दिले होते. प्रत्येक वेळी क्षितीजला 50 ग्रॅम वीड दिले असल्याचे पटेलने एनसीबीला सांगितले. 

पटेलने करमजीतच्या सांगण्यावरून अंकुश अरेनजालाही ड्रग्स पुरवले होते. हा करमजीत तोच वितरक आहे ज्याच्याकडून सुशांत सिंग राजपूतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडाही ड्रग्स खरेदी करायचा. हेच ड्रग्स सुशांत सिंगपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे याप्रकरणी अटक ड्रग्स वितरक करमजीत मिरांडा, सुशांत सिंग, रिया चक्रवर्ती व शौविक यांच्याशी संबंधित ड्रग्स साखळीशीही संबंधीत होता.

अंकुश अरेनजा हा हॉटेल व्यावसायिक असून पवईतील एका बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा आहे. याशिवाय करमजीत आनंद ऊर्फ केजे दोघेही मोठे ड्रग्स वितरक आहेत. यातील अनरेजाकडून एनसीबीने मर्सिडीज कार जप्त केली असून त्याचा वापर ड्रग्स तस्करीसाठी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. केजे याने अंधेरीतील क्‍लबमध्ये सुशांतला वीड (गांजा) पुरवला होता. तसेच रिया चक्रवर्तीच्या सांताक्रूझ येथील घरी व सुशांतच्या वांद्रे येथील घरीही केजेने ड्रग्स पोहोचवले असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

जोहरच्या पार्टीचा सुशांत सिंग प्रकरणाशी संबंध नाही
निर्माता करन जोहर यांच्या घरी झालेली पार्टी व सुशांत सिंग मृत्यू प्रकरणाचा कोणताही संबंध नसल्याचे एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे याप्रकरणी एनसीबी सध्या तरी तपास करत नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख