जयंत पाटील म्हणतात, 'पिक्‍चर अभी भी बाकी है..!'  - Jayant Patil says, 'Picture is still left ..!' | Politics Marathi News - Sarkarnama

जयंत पाटील म्हणतात, 'पिक्‍चर अभी भी बाकी है..!' 

सरकारनामा ब्यूरो 
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

खडसे यांच्यावर जो अन्याय झाला, त्यावर सभागृहात सर्वात जास्त मी बोललो आहे.

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे 2014 मध्ये सरकार आले. गेल्या चार ते पाच वर्षांत अशा काही घटना घडल्या की पहिल्या रांगेत बसणारे एकनाथ खडसे यांना जाणीवपूर्वक मागच्या रांगेत बसावे लागले. हे भारतीय जनता पक्षात झाले. कट कारस्थाने झाली असतील, त्यावर मी जादा बोलणार नाही. पण, खडसे यांच्यावर जो अन्याय झाला, त्यावर सभागृहात सर्वात जास्त मी बोललो आहे आणि आज त्यांना कळेल की "अभी भी पिक्‍चर बाकी है,' असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजवर निशाणा साधला. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या मुंबईतील कार्यालयात एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम झाला. त्या वेळी पाटील बोलत होते. ते म्हणाले 

मी आणि एकनाथ खडसे एकाचवेळी महाराष्ट्राच्या विधानसभेत आलो. मधुकरराव चौधरी विधानसभेचे अध्यक्ष होते, तेव्हापासून खडसे यांनी सभागृहाचे सदस्य काय करू शकतो, हे खडसे यांनी दाखवून दिले. त्यानंतर विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी धडाडीने काम केले. भारतीय जनत पक्षाचे 2014 मध्ये सरकार आले. त्यात खडसेंसारखा दिग्गज नेता मंत्री झाला. मात्र, चार ते पाच वर्षांपासून अशा काही घटना घडल्या की पहिल्या रांगेत बसणाऱ्या खडसे यांना जाणीवपूर्वक मागच्या रांगेत बसावे लागले. खडसे यांच्यावर जो अन्याय झाला, त्यावर सभागृहात सर्वात जास्त मी बोललो आहे.' 

राज्याच्या राजकारणात सुडाचे राजकारण कधी ऐकले नव्हते, मात्र, गेल्या काही वर्षांत हे पहायला मिळाले. यशवंतराव चव्हाणपासून शरद पवारांपर्यंत सुसंस्कृत राजकारण केले जात होते. मात्र गेल्या काही वर्षांत ते पाळले गेले नाही. तसे वातावरण मागील काही वर्षांत राहिले नाही, असा आरोप पाटील यांनी भाजप नेतृत्वावर केला. 

"आम्ही शरद पवारांच्या नेतृत्वात काम करीत होतो. लोकसभा निवडणुकीवेळी आम्हाला फटका बसला. पवारांनी ज्यांच्यावर विश्‍वास ठेवला, जबबादाऱ्या दिल्या, ते आम्हाला विधानसभा निवडणुकीच्या वेळी सोडून गेले. मात्र, आम्हाला विश्‍वास होता ती राज्यातील जनता पवारांचा विचारच नक्की स्वीकारेल आणि झालेही तसेच. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरून त्यांनी नवचेतना जागवली. आम्ही पवारांसोबत आहोत, अशी भावना त्या वेळी राज्यात होती. त्यातून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले,' असे जलसंपदा मंत्री पाटील यांनी नमूद केले. 

महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आजच दहा हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. शेतकऱ्यांना वाऱ्यावर न सोडण्याची आमची भूमिका आहे. मात्र, केंद्राने केलेल्या कायदामुळे आधारभूत किमतीला धक्का पोचेल की काय? असा प्रश्‍न निर्माण झाला. मार्केट कमिटी अथवा बाहेर शेतीमाल विकला तर त्याला आधारभूत किंमत मिळणार आहे की नाही, याबाबतचा खुलासा अद्याप केंद्राकडून झालेला नाही. उद्योगधार्जिणी धोरणे होत असतील, त्याला धक्का देण्याची गरज आहे, असेही पाटील म्हणाले. 

जयंत पाटील यांनी व्यक्ती केली दिलगिरी 

सोशल डिस्टिन्सिंग पाळून हा कार्यक्रम घेण्याचे शरद पवारांनी सांगितले होते. मात्र गर्दीमुळे ते शक्‍य झाले नाही. जी जबाबदारी आमच्यावर सोपवली होती, ती गर्दीमुळे पाळता आली नाही, यासाठी मी प्रथम दिलगिरी व्यक्त करतो, असे जयंत पाटील यांनी सांगितले. 
Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख