मुंबई : महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढण्याचे श्रेय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनाच द्यावे लागेल. शिवसेनेने युती केली नसती तर ग्रामीण भागात भाजप वाढला नसता. महाराष्ट्रात भाजपला गावागावांत पोहचविणारे बाळासाहेब ठाकरेच होते. हे सत्य भाजपचे नेतेही मान्य करतात, अशा शब्दांत शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी भाजपला शिवसेनेच्या ताकदीची आठवण करून दिली. तसेच भाजपने शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित करू नयेत, असेही त्यांनी ठणकावले.
बाळासाहेब ठाकरे यांची आज 95 वी जयंती. यानिमित्त संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, त्यावेळी राज्यात गावागावांत शिवसेनेचे अस्तित्व होते. भाजप नव्हती. शिवसेनेने युती केल्यामुळे भाजप गावात पोहचली. ही गोष्ट आमच्यासाठी अभिमानाची होती. कारण 'गर्व से कहो हम हिंदू है' हा नारा देऊन आम्ही एकत्र आलो होतो.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी केल्याने भाजपकडून सातत्याने शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या मुद्यावर प्रश्न उपस्थित केले जातात. यावर बोलताना राऊत यांनी 'भाजपने कोणतेही प्रश्न निर्माण करू नयेत. कारण त्यांची प्रश्नपत्रिका अजून महाराष्ट्राच्या चाचणी परीक्षेत यायची आहे,' असा टोला लगावला. भाजप अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांना विसरले असे आम्ही म्हणत नाही. त्याचप्रमाणे बाळासाहेब ठाकरे यांना कोणी विसरू शकत नाही. त्यांची प्रखर हिंदुत्ववादाची भुमिका कोणी विसरू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
सत्ता गेल्याने भाजपचे मानसिक संतुलन बिघडले आहे. अशा वेळी योग्य उपचार झाले तर ते सुधारतील नाहीतर बोलत राहतील. ते कितीही बोलले तरी महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे. त्यांना सर्व कळते. राज्याचे मुख्यमंत्री अत्यंत लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत. काँग्रेस पक्षाविषयी कोणी काही म्हणत असेल तर ते दीडशे वर्षांपासून देशात आहे. स्वातंत्र्यलढ्यातील पक्ष आहे, असेही राऊत म्हणाले.
लेखणी व वाणी ही त्यांची शस्त्र
बाळासाहेब ठाकरे सगळ्यांचे होते. जातीपाती विरहित महाराष्ट्र, राजकारणापलिकडला मराठी माणूस एकत्र येऊन महाराष्ट्र घडविला पाहिजे, हे त्यांचे स्वप्न होते. त्यांच्या व्यक्तिमत्वसमोर प्रत्येक पक्षातील नेते नम्र होतात. लेखणी आणि वाणी ही त्यांची दोन अमोघ शस्त्र होती. त्यातूनच त्यांनी सत्ता परिवर्तन केले. ही शस्र आम्ही तशीच तळपत ठेवली असल्याचे राऊत यांनी सांगितले.
मराठी माणसाला लढण्याचे बळ दिले
नेते खुप निर्माण होतात, लोकनेते होतात. पण बाळासाहेब ठाकरे एकच. देशाच्या राजकारणाला एक वेगळी दिशा दिली. त्यावेळी हिंदुत्वाची लाट निर्माण झाल्याचे श्रेय बाळासाहेब ठाकरे यांनाच द्यावे लागेल. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, जॉर्ज फर्नांडिस हे मोठे नेते त्यांच्यासोबत होते. त्यांचे स्मरण महाराष्ट्राला कायम ठेवावेच लागेल. कारण मराठी माणूस 50 वर्षांपुर्वी खचला होता. आपला विश्वास गमावला होता. त्याच्या मनगटामध्ये लढण्याचे बळ दिले. त्यामुळे मराठी माणूस आज उभा आहे. मराठी माणसाला 'मी मराठी आहे' हे गर्वाने बोलायला शिकविल्याचे राऊत म्हणाले.
त्यांच्या आठवणीशिवाय दिवस जात नाही
बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रासाठी अनेक घाव झेलले. आमच्यासारखी लोकं त्यांच्या प्रेरणेतून उभी राहिली. त्यांच्यासोबत मी सलग 30 वर्षे सहवासात होतो. त्यांच्या आठवणीशिवाय एकही दिवस जात नाही. अनेक शतके मराठी माणूस त्यांचे स्मरण करत राहील. बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री दिले. तो काळ वेगळा होता. ती चळवळ वेगळी होती. त्यावेळी काँग्रेस सत्तेत होती. मी या महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन, हे त्यांचे स्वप्न होते. मनोहर जोशी व नारायण राणे हे बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मुख्यमंत्री झाले. आज स्वतः उद्धव साहेब मुख्यमंत्री आहेत. आमच्या सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे, अशी आठवण राऊत यांनी सांगितली.
Edited By Rajanand More

