मुंबई : मराठा विद्यार्थी व नोकरी मागणारे उमेदवार यांना न्याय मिळावा यासाठी आज सरकारकडे हात जोडून विनंती करीत आहोत. ही विनंती मान्य झाली नाही तर हात सोडून संघर्ष करू व त्याची पुढील जबाबदारी सरकारची राहील, असा इशारा विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला.
मराठा आरक्षित गटातून निवड झालेल्या पण सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे अंतिम नियुक्तीपत्र न मिळाल्याने आंदोलनाला बसलेल्या मराठा उमेदवार आणि विद्यार्थ्यांची आज दरेकर यांनी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
महाविकास आघाडी सरकारला मराठा विद्यार्थ्यांचे काहीच सोयर सुतक दिसत नाही. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलनाला बसलेल्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी सरकारला वेळ नाही. त्यामुळे आज आम्ही सरकारला हात जोडून हा प्रश्न सोडविण्यासाठी विनंती करीत आहोत.
जर ही विनंती सरकारने मान्य केली नाही तर आम्हीही हात सोडून मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी संघर्ष करु. त्यानंतर जी परिस्थिती निर्माण होईल त्याला सर्वस्वी महाविकास आघाडी सरकार जबाबदार असेल असा इशारा दरेकर यांनी दिला.
मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांना आमचा पाठींबा आहे. सरकार प्रत्येक दिवशी नवीन नोकर भरती जाहीर करत आहे. आरोग्य विभाग, गृह विभाग यांनी नवीन नोकर भरती जाहीर केली. याचा अर्थ सरकारच्या मनात पाप आहे. जर या नवीन भरती झाल्या तर मराठ्यांच्या एसईबीसी ( सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास ) आरक्षणाचा उपयोग काय, असा प्रश्न दरेकर यांनी उपस्थित केला.
आपण कोणत्याही जाती-धर्माच्या समाजाच्या विरोधात नाही. पण मराठा समाजाची मुले सर्व विभागाच्या भरतीत एसईबीसी प्रवर्गातून वंचित राहावी, याचसाठी हे सर्व सुरु आहे. मराठ्यांनी ईडब्लूएस मध्ये अर्ज करावा, पण या प्रवर्गामध्ये आधीपासून अन्य प्रवर्ग समाविष्ट असल्यामुळे मराठा समजाच्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार नाही. हे स्पष्ट असल्यानेच सरकार या सर्व खटपटी करित असल्याचा आरोप दरेकर यांनी केला.
या प्रश्नावर सरकारने तळमळीने निर्णय घेतला नाही, आंदोलने शांत झाली की मराठा विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडले जाते. परंतु आता आम्ही राजकारणाच्या पलीकडे जाऊन या मुलांच्या पाठीशी उभे आहोत. मग यासाठी कायदेशीर लढाई असेल वा रस्त्यावरची लढाई असेल तरीही त्यामध्ये आम्ही या मुलांच्या पाठीशी उभे राहू, असे दरेकर यांनी ठामपणे सांगितले.
Edited By - Amol Jaybhaye

