हिंमत असेल तर नारायण राणेंनी 2024 ची निवडणूक लढवावी : सेना आमदाराचे आव्हान - If Nitesh had not fought on the BJP ticket he too would have fallen claims Vaibhav Naik | Politics Marathi News - Sarkarnama

हिंमत असेल तर नारायण राणेंनी 2024 ची निवडणूक लढवावी : सेना आमदाराचे आव्हान

राजेश सरकारे 
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

राणेंनी 2019 ची निवडणूक लढायला हवी होती; पण पुन्हा एकदा पराभव नको म्हणून त्यांनी त्यावेळच्या निवडणुकीतून पळ काढला होता.

कणकवली : शिवसेना संपवू पाहणाऱ्या नारायण राणेंना सिंधुदुर्गातील जनतेनेच नाकारलेय. त्यामुळे त्यांनी पुन्हा पुन्हा शिवसेना संपविण्याची भाषा करू नये.

लढण्याची एवढीच खुमखुमी असेल तर 2024 ची निवडणूक त्यांनी लढवून दाखवावी, त्यांना पुन्हा एकदा दणदणीत पराभव पाहायला मिळेल, असे प्रत्युत्तर आमदार वैभव नाईक यांनी येथे दिले. 

राणेंनी शिवसेनेवर केलेल्या टिकेला त्यांनी उत्तर दिले. नाईक म्हणाले, की राजकीय अस्तित्व संपलेल्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना संपविण्याचे आव्हान दिलंय; पण त्यांचे आव्हान आम्ही 2014 च्या निवडणुकीत स्वीकारलं होतं. यात खुद्द नारायण राणेंनाच पराभव झाला. एवढंच नव्हे तर त्यांच्या मुलाचाही लोकसभा निवडणुकीत आम्ही पराभव केला. जर नीतेश राणे भाजपच्या तिकिटावर लढले नसते तर त्यांनाही पराभवाचाच सामना करावा लागला असता. 

सावंत म्हणाले, " कोकणातून निवडून आलेले शिवसेनेचे 11 आमदार पुढे त्या पदावर नसणार असे राणे म्हणत आहेत; पण आम्ही पुढच्या निवडणुकीत शिवसेनेचे 21 आमदार निश्‍चितपणे निवडून आणून दाखविणार आहोत. खरं तर राणे जेव्हा जेव्हा शिवसेना संपविण्याची भाषा करतात, त्या प्रत्येकवेळी त्यांचाच पराभव झालांय आणि शिवसेना पक्ष सातत्याने वाढत आहे. एवढेच नव्हे तर राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे.``

राणेंनी 2019 ची निवडणूक लढायला हवी होती; पण पुन्हा एकदा पराभव नको म्हणून त्यांनी त्यावेळच्या निवडणुकीतून पळ काढला होता. आता आमचे तुम्हाला आव्हान आहे की, 2024 च्या विधानसभा निवडणुकीला तुम्ही कुडाळ-मालवणमधून निवडणूक लढवून दाखवा. त्यावेळी तुम्हाला कळेल की शिवसेनेचे 11 नव्हे तर 21 आमदार निवडून आलेले असतील आणि तुम्हाला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागेल हे सांगण्यास वैभव नाईक विसरले नाहीत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख