पंतप्रधान बोलत असताना वीज गेली असती तर तुम्ही हेच उत्तर दिले असते का?  - If the light had gone while the Prime Minister was speaking, would you have given the same answer? | Politics Marathi News - Sarkarnama

पंतप्रधान बोलत असताना वीज गेली असती तर तुम्ही हेच उत्तर दिले असते का? 

सरकारनामा ब्यूरो 
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

तुम्ही झालेल्या चुका लपवत आहात काय?

मुंबई : मुंबईची आयलॅंडिंग यंत्रणा 12 ऑक्‍टोबरला कार्यान्वित न झाल्याने रेल्वेसह अत्यावश्‍यक सेवेचा वीजपुरवठाही काही कालावधीसाठी बंद झाला होता. यावरून सोमवारी (ता.26 ऑक्‍टोबर) ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी टाटा पॉवर या वीजनिर्मिती कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. 

मुंबईत संसद असती आणि पंतप्रधान बोलत असताना वीज ठप्प झाली असती, तर तुम्ही हेच उत्तर दिले असते का? असा प्रश्‍न राऊत यांनी अधिकाऱ्यांना विचारला. 

राज्याला अखंडित वीज पुरवठा करण्यात महत्त्वाची भूमिका वठविणाऱ्या राज्य भार प्रेषण केंद्र, ऐरोली (एसएलडीसी) येथे राऊत यांनी सोमवारी (ता. 26) प्रत्यक्ष भेट देऊन या केंद्राचे कामकाज कसे चालते, याची पाहणी केली. या वेळी टाटा वीज कंपनीचे अधिकाऱ्यांनी त्यांच्यासमोर मुंबई आयलॅंडिंग यंत्रणा नेमकी काय आहे. 12 ऑक्‍टोबरला नेमके काय घडले? याबद्दल सादरीकरण केले. 

यावेळी "मुंबईचे आयलॅंडिंग करणे आणि बाहेरून मुंबईला होणारा वीजपुरवठा ठप्प झाल्यावर मुंबई शहराला अतिरिक्त वीज पुरवठा करणे ही जबाबदारी तुमच्यावर असताना तुम्ही झालेल्या चुका लपवत आहात काय, असा सवालही ऊर्जामंत्री राऊत यांनी उपस्थित केला. चुका झाल्या असतील तर त्या प्रामाणिकपणे कबूल करा, असेही राऊत अधिकाऱ्यांना म्हणाले.

जर मुंबईत संसद असती आणि पंतप्रधान बोलत असताना वीज ठप्प झाली असती तर तुम्ही हेच उत्तर दिले असते का, असे प्रश्‍न विचारत राऊत यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. 

या बैठकीला ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, महापारेषणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे, महापारेषण संचालक संजय ताकसांडे, तांत्रिक सल्लागार उत्तम झाल्टे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. 

मुंबईला बाहेरून सुरळीत वीजपुरवठा करणे आणि बाहेरून होणारा वीजपुरवठा ठप्प झाल्यावर शहराला अतिरिक्त वीज पुरवठा करण्यासाठी आयलॅंडिंग यंत्रणा सुरळीत ठेवणे आवश्‍यक असताना ती सुरू होऊ शकली नाही. या बाबीतील त्रुटी शोधून अहवाल सादर करण्यासाठी तांत्रिक लेखापरीक्षण समिती नेमली आहे. त्यांच्या अहवालानुसार दोषींविरुद्ध कडक कारवाई केली जाईल. 
- डॉ. नितीन राऊत, ऊर्जामंत्री 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख