अदर पूनावालांना धमकी देणाऱ्यांची नावे माझ्याकडे आहेत; आशिष शेलारांचा गौप्यस्फोट - I have information about those who threatened Adar Poonawala; Ashish Shelar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

अदर पूनावालांना धमकी देणाऱ्यांची नावे माझ्याकडे आहेत; आशिष शेलारांचा गौप्यस्फोट

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 3 मे 2021

अदर पूनावाला  यांनी ब्रिटनमधील 'द टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीवरुन मोठा गदारोळ सुरू आहे.

मुंबई : जगातील सर्वांत मोठी लस उत्पादक कंपनी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी देशातील बड्या व्यक्तींकडून धमक्या मिळत असल्याचा गौप्यस्फोट केला होता. यामुळे पत्नी आणि मुलांसह ते लंडनमध्ये गेले आहेत. यावर ''अदर पूनावाला यांना आताच्या काळात सुरक्षा का मागावीशी वाटली हा प्रश्न गंभीर आहे. दिशादर्शन जर स्थानिक, प्रादेशिक पक्षांकडे जात असतील तर हा गंभीर मुद्दा आहे. केंद्र सरकारने सुरक्षा पुरवत आपले काम चोख केले आहे'', असे भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

अदर पूनावाला यांना नुकतीच केंद्र सरकारने 'वाय' दर्जाची सुरक्षा दिली आहे. काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह बड्या व्यक्तींकडून धमक्या येत असल्याचा गौप्यस्फोट पूनावाला यांनी केला होता. कोरोनाच्या संकटात आज आम्हाला राजकारण करायचे नाही. लोकांची सेवा करणे भाजपचे धोरण आहे. असेही ते म्हणाले. 

हे ही वाचा : शरद पवार म्हणाले, हा तर रडीचा डाव!

''या प्रकरणात ज्यांच्यापर्यंत धागेदोरे जातील त्या पक्षाला उघडे करण्याचे काम परिस्थिती निवळल्यानंतर भाजप करणार आहे. माझ्याकडे आणि पक्षाकडे याची माहिती आहे. त्यावर आज भाष्य करणार नाही. ज्यांचा हात आहे त्यांनी खबरदार राहावे, आमच्याकडे माहिती येत आहे'', असा इशारा यावेळी शेलार यांनी दिला. 

अदर पूनावाला  यांनी ब्रिटनमधील 'द टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीवरुन मोठा गदारोळ सुरू आहे. पूनावाला यांनी कुंभमेळा आणि भारतातील निवडणुकांबाबत बोलण्यास या मुलाखतीत नकार दिला आहे. हे दोन्ही विषय संवेदनशील आहेत आणि धमक्या येत असल्याने यावर बोलणार नाही. मी खरे बोललो तर माझे शिर धडावेगळे होईल, असे पूनावालांनी म्हटले आहे. देशातील परिस्थिती एवढी बिघडेल, असे देवालाही वाटले नसेल, असेही त्यांनी म्हटले आहे. देशातील चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला अशी टीका सुरू आहे. याविषयी पूनावालांना विचारणा करण्यात आली होती. 

या मुलाखतीत पूनवालांनी म्हटले आहे की, सिरम दुसऱ्या देशात आता लस उत्पादन प्रकल्प सुरू करणार आहे. याबाबतची घोषणा पुढील काही दिवसांत होईल. माझ्या खांद्यावर सध्या मोठे ओझे आहे. भारतातील काही शक्तिशाली व्यक्ती मला धमक्या देत आहेत. यामुळे पत्नी आणि मुलांसमवेत लंडनमध्ये आलो आहे. कोव्हिशिल्ड लशीसाठी अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, उद्योगपती मला धमकीचे कॉल करीत आहेत.

हे ही वाचा : रोजंदारीवर जाणाऱ्या मजुराची पत्नी बनली आमदार!

सिरमने इतर देशांसोबत लस पुरवठ्यासाठी करार केले होते. या करारानुसार या देशांना लसपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे इतर देशांमध्ये उत्पादन प्रकल्प सुरू करण्याचे नियोजन सिरमने केले आहे. याबद्दलची घोषणा अदर पूनावाला लवकरच करणार आहेत. सिरमचा उत्पादन प्रकल्प ब्रिटनमध्येच सुरू होण्याची शक्यता आहे. 

ब्रिटनने भारतीय प्रवाशांवर बंदी घालण्याआधीच आठ दिवसांपूर्वी अदर पूनावाला हे पत्नी आणि मुलांसमवेत लंडनमध्ये दाखल झाले आहेत. सिरमची लस उत्पादनाची क्षमता जुलैपर्यंत दरमहा 10 कोटी डोसपर्यंत जाऊ शकेल. पुढील सहा महिन्यांत सिरमची वार्षिक उत्पादन क्षमता अडीच अब्ज डोसवरुन 3 अब्ज डोसवर नेण्याचा प्रयत्न आहे, असेही पूनावालांनी म्हटले होते. 

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे. आता रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापरासही केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख