दानवे, ज्योतिष जाणतात, हे मला माहीत नव्हतं : पवारांनी उडवली खिल्ली  - I did not know that Raosaheb Danve is an expert in astrology: Sharad Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

दानवे, ज्योतिष जाणतात, हे मला माहीत नव्हतं : पवारांनी उडवली खिल्ली 

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

सामान्य माणूस बरोबर असल्यावर कुडमुड्या ज्योतिषाची गरज लागत नाही.

मुंबई : "रावसाहेब दानवे यांनी विधी मंडळ आणि संसदेत काम केलं आहे, त्यांचा हा गुण (ज्योतिष पाहणे) मला माहीत नव्हता. 
उद्याचं चित्र सांगण्याची त्यांच्याकडे कला आहे, ज्योतिष शास्त्राचे जाणकार म्हणून मला त्यांचा परिचय नव्हता,' अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची खिल्ली उडवली. 

भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी आज (ता. 24 नोव्हेंबर) पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी खास पुणेरी शैलीत रावसाहेब दानवे यांचा समाचार घेतला. 

"महाराष्ट्रात येत्या दोन महिन्यांत भारतीय जनता पक्षाचे सरकार येणार आहे,' असं भाकीत केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांनी केलं होतं. त्याबाबत पवार यांना आज मुंबईत पत्रकार परिषदेत प्रश्‍न विचारण्यात आला होता. त्या वेळी पवारांनी वरील मिश्‍किल टिप्पणी केली. 

दानवे यांना विधीमंडळात तसेच देशाच्या संसदेतही काम करताना मी पाहिले आहे. पण, ज्योतिष जाणत असल्याचा गुण मला माहीत नव्हता, असे पवार म्हणाले. "सामान्य माणूस बरोबर असल्यावर कुडमुड्या ज्योतिषाची गरज लागत नाही,' असे सांगून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार स्थिर असल्याचे अप्रत्यक्षपणे पुन्हा एकदा त्यांनी सांगितले. 

महाराष्ट्रात पुन्हा सत्ता मिळत नाही, या रागातून ईडीची कारवाई
"लोकांच्या प्रश्नाची उत्तरं देण्याऐवजी राजकीय विरोधकांच्या विरोधात सरकारी तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. महाराष्ट्रात पुन्हा सत्ता मिळत नाही, या रागातून ईडीची कारवाई करण्यात आली आहे,' असा गंभीर आरोप ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर सक्तवसुली संचानलयाकडून (ईडी) करण्यात आलेल्या कारवाईच्या पार्श्‍वभूमीवर पवार यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर निशाणा साधला. 

शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रात आज जे सरकार आहे, त्याला सर्वसामान्यांचा पाठिंबा मिळतो आहे, त्यामुळे विरोधकाचं नैराश्‍य वाढलं आहे, त्यातून हे ईडीसारख्या संस्थेकडून कारवाई केली जात आहे. महाराष्ट्रात आपल्याला पुन्हा सत्ता मिळत नाही, ते पाहून रोष व्यक्त करत आहेत. सत्तेचा गैरवापर करण्याची ही पद्धत आहे. 

सत्ता गेल्यावर किती त्रास होतो आहे, हे आज आपण महाराष्ट्रात पाहत आहोत. काही जण उद्वेगातून काहीही बोलत आहेत. माणसाने आशा ठेवावी, त्यात वाद नाही. मागे म्हटले होते मी पुन्हा येईन ठीक आहे. लोक लक्षात ठेवतात आणि खबरदारी घेतात, अशी कोपरखळीही पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मारली. 

ज्यांना (चंद्रकांत पाटील) लोक गांभीर्याने घेतात, त्यांच्याविषयी प्रश्न विचारा, असे चंद्रकांत पाटील यांच्याबाबत विचारण्यात आलेल्या एका प्रश्‍नावर शरद पवार म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख