कर्तृत्त्ववान मराठा स्त्री राज्याची मुख्यमंत्री होण्यास माझाही पाठिंबा : राष्ट्रवादीच्या दिशेने शेलारांची गुगली

शेलारांच्या उल्लेखाने राजकीय वर्तुळात चर्चा
sharad-pawar-ashish-Shelar
sharad-pawar-ashish-Shelar

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे संपादित `कर्तृत्ववान मराठा स्त्रिया` या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात भाजप नेते आशिष शेलार यांनी केलेल्या एका विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. या समारंभाला राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव हे उपस्थित होते.

ज्ञानेश महाराव यांनी समारंभास उपस्थित असेलल्या व्यक्तींचे नाव घेताना महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आशिष शेलार यांचा असा उल्लेख केला. तसेच देशाचे नेते असे शरद पवार यांना संबोधले. महारावांचे `भावी मुख्यमंत्री` असे संबोधन शेलारांनाही ते चकीत करणार ठरले.

त्यानंतर आपल्या भाषणात त्यांनी याचा उल्लेख करत चर्चा वेगळ्या पातळीवर नेली. महाराष्ट्रतील कर्तृत्ववान मराठा स्त्रियांवर मुंबई विद्यापीठात संशोधन होण्याची गरज आहे असं म्हणत राज्यात कर्तृत्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. "संदर्भ पुन्हा अनचॅलेंज राहू नये म्हणून, जर विषय मुख्यमंत्रिपदाचा असेल, तर पवारसाहेब, कर्तृत्त्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी, अशी अपेक्षा बाळागणारा समाजात मोठा वर्ग आहे, त्याला माझ्यासारख्या माणसाचं सुद्धा समर्थन असू शकतं, असे त्यांनी सांगितले

महाराष्ट्रात मोठ्या पदावर बरीच लोकं आहेत, पण मोठ्या मनाने मोठ्या पदावर बसलेली व्यक्ती या महाराष्ट्रात कमी दिसतात. पवार यांचा समावेश अशा व्यक्तींत होतो. मला कुणाशीही तुलना करायची नाही, पण अशा व्यक्ती कमी आहेत, असे शेलारांनी सांगितले.  शेलार यांचा रोख कोणाकडे होता, हे मात्र कळू शकले नाही.

विजय चोरमारे यांनी ‘कर्तृत्वान मराठा स्त्रिया’ हे पुस्तक सावित्रीबाई फुलेंना अर्पण करून या पुस्तकाच्या माध्यमातून एका जातीचं उदात्तीकरण करण्यात आल्याच्या मानसिकतेलाही छेद दिल्याचा उल्लेख आशिष शेलार यांनी यावेळी केला. महाराव आणि शेलार यांच्या या वक्तव्यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे पवार यांनी आपल्या भाषणात टाळले.

पवार म्हणाले की अनेकांना ज्यांच्या जीवनकार्याबद्दल माहिती नाही अशा कर्तृत्ववान स्त्रियांचे आयुष्य या पुस्तकाद्वारे प्रकाशझोतात आणण्याची जबाबदारी श्री. चोरमारे यांनी आपल्या खांद्यावर घेतली आणि पुस्तकाची योग्य मांडणी करण्याची जी भूमिका त्यांनी पार पाडली, ती माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. यातील काही भगिनींचे कार्य मी जवळून पाहिले आहे. हौसाताई पाटील, जयमाला शिलेदार, आनंदीबाई शिर्के, लक्ष्मीताई नायकवडी, हिराबाई बडोदेकर यांचे कर्तृत्व जवळून पाहण्याची संधी मला मिळाली. यातील काही भगिनींनी महाराष्ट्राच्या विधिमंडळात दिलेले योगदान लक्षणीय आहे. राजकारण, कला, सार्वजनिक जीवनात तसेच विविध क्षेत्रात कार्य केलेल्या परिचित आणि अपरिचित अशा भगिनींच्या जीवनाचे वास्तव चित्रण पुस्तकात उत्तमरीतीने करण्यात आले आहे. त्यांच्या कार्याची नोंद या पुस्तकाच्या रूपाने घेण्यात आली याचा मला आनंद आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com