शंभर टक्के लॉकडाउन तूर्तास तरी नाही.... - hundred percent lockdown is not for now Rajesh Tope | Politics Marathi News - Sarkarnama

शंभर टक्के लॉकडाउन तूर्तास तरी नाही....

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 10 एप्रिल 2021

लॉकडाउनच्या नियमांचं उल्लंघन केल्यास पोलिस कारवाई करू शकतात.

मुंबई : ''लगेचच 100 टक्के लॉकडाऊन करण्याचा विषय तूर्तास तरी नाही, निर्बंध कडक करणं आणि त्यांची अंमलबजावणी महत्त्वाची आहे. लॉकडाउनच्या नियमांचं उल्लंघन केल्यास पोलिस कारवाई करू शकतात. माझं महाराष्ट्राच्या जनतेला आव्हान आहे. सरकारला सहकार्य करा,'' असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राजेश टोपे म्हणाले की, आरोग्य विभागाच्या अंदाजानुसार, 30 एप्रिलपर्यंत राज्यात अॅक्टिव्ह केसचा आकडा 11 लाखापर्यंत पोहोचेल. यातील 20 टक्के लोकांना रुग्णालयात दाखल करावं लागेल, असा अंदाज धरला तर, दोन-अडीच लाख लोकांना ऑक्सिजन, आयसीयू सेवा लागतील. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, राज्याला दररोज दीड लाख रॅमडेसिव्हिर इंजेक्शनची गरज आहे. दुप्पट इंजेक्शन मिळाले तर लोकांना याचा फायदा होईल. रॅमडेसिव्हिर उत्पादकांनी 20 दिवसांचा अवधी मागितला आहे. 

 ''चार - पाच दिवसांच्या लॉकडाउनने काही होत नाही. चेन ब्रेक करायची असेल तर 15 दिवस ते 21 दिवसांचा लॉकडाउन गरजेचा आहे. लॉकडाउनची परिस्थिती निर्माण होईल तेव्हा मुख्यमंत्री निर्णय घेतील,'' असे टोपे यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यात शुक्रवारी (ता.९) एकाच दिवसात ७ हजार ८४२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे कालअखेरपर्यंत जिल्ह्यातील एकूण सव्वा पाच लाखांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात काल १० हजार २५ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.कालच्या एकूण रुग्णांत पुणे शहरातील सर्वाधिक ५ हजार ६४७ रुग्ण आहेत. दिवसांत ६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  एकूण मृत्यूंमध्ये शहरातील ४४ मृत्यू आहेत.

यामुळे जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आता ९१ हजार ७१२ झाली आहे. यापैकी २१ हजार ८३१ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. उर्वरित ६९ हजार ८८१ जण गृह विलगीकरणात आहेत. गेल्या २४ तासांत मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांत शहरातील सर्वाधिक मृत्यूबरोबरच पिंपरी चिंचवडमधील १७, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील पाच आणि नगरपालिका हद्दीत तीन मृत्यू झाले आहेत.  कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात एकही मृत्यू झाला नाही.

Edited by: Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख