गृहमंत्री अनिल देशमुख दिल्लीत शरद पवारांच्या भेटीला - Home Minister Anil Deshmukh meets NCP Chief Sharad Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

गृहमंत्री अनिल देशमुख दिल्लीत शरद पवारांच्या भेटीला

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 19 मार्च 2021

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर कारमध्ये सापडलेल्या जिलेटीनच्या कांड्या, मनसुख हिरेन यांचा मृत्यू तसेच सचिन वाझे प्रकरण राज्यात गाजत आहे.

नवी दिल्ली : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर कारमध्ये सापडलेल्या जिलेटीनच्या कांड्या, मनसुख हिरेन यांचा मृत्यू तसेच सचिन वाझे प्रकरण राज्यात गाजत आहे. त्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सरकारवर जोरदार टीका केली आहे. या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नाराज असल्याची चर्चाही आहे. त्यातच आज देशमुख दिल्लीत पवारांच्या भेटीला पोहचले आहेत. 

देशमुख यांनी काल एका मुलाखतीत अँटिलिया स्फोटक प्रकरणात आमच्या अधिकार्‍यांकडून गंभीर चुका झाल्याची कबुली दिली आहे. एटीएस (ATS) आणि एनआयएकडून (NIA) याचा तपास सुरू आहे. चौकशीतून जे समोर येईल त्यानुसार जो दोषी असेल त्यांच्यावर कारवाई होईल,'' असे सांगत देशमुख यांनी पोलिस खात्यात सारे काही आलबेल नसल्याची कबूलीही दिली.

मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांच्या बदलीवर बोलताना देशमुख म्हणाले, "ही प्रशासकीय बदली नाही. जो तपास सुरु आहे, ज्या पद्धतीने मुंबई पोलिस आयुक्तालयातल्या सहकाऱ्यांच्या हातून चुका झाल्या आहेत. जो चौकशी अहवाल येईल त्यावर कारवाई करण्यात येईल. या प्रकरणाच्या चौकशीतून काही गोष्टी समोर आल्या त्या माफ करण्यासारख्या नाहीत, त्यामुळे चौकशीत बाधा येऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांबरोबर बसून आम्ही आयुक्त बदलण्याचा निर्णय घेतला. पोलिस आयुक्तालयातील सहका-यांच्या माध्यमातून ज्या चुका झाल्या म्हणून आयुक्तांची बदली करण्यात आली.'' 

गृहखाते तीन जण चालवतात या विरोधकांच्या आक्षेपावर बोलताना देशमुख म्हणाले, ''विरोधी पक्ष त्यांचे काम करताहेत. गृहखाते अनिल देशमुखच चालवतात. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा प्रश्न असतो, तेव्हा मुख्यमंत्र्यांचीही सही महत्त्वाची असते. त्यामुळे अशा बाबतीत मुख्यमंत्र्यांशी विचारविनिमय करुन निर्णय घेतले जातात.'' 

अँटिलिया स्फोटक तपास प्रकरण राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडून (NIA)केला जात आहे. त्याबाबत बोलताना देशमुख म्हणाले, "ज्या ठिकाणी स्फोटके येतात त्यावेळी एनआयए तपास करते. महाराष्ट्रात आधी ज्या  घटना घडल्या तेव्हा केंद्रीय यंत्रणांनी तपास केला. सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला. मात्र आठ महिने होऊनही तपासाबाबत काही कळलेले नाही. पण केंद्रातल्या तपास यंत्रणा चांगल्या आहेत. त्यांना काही ठिकाणी यश येते काही ठिकाणी अपयश येतं. मुंबई पोलिसांत जे घडले त्यात ते दोषी शोधून काढतील ही माझी खात्री आहे. आमची एटीएसही चांगले काम करत आहे. एनआयए व एटीएस अत्यंत प्रोफेशनली तपास करत आहेत,'' 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख