हाताला धरून खेचणे हा महिलेचा विनयभंग, न्यायालयाचा निर्णय

आरोपींनी लैंगिक शोषण करण्यासाठी मुलींचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला, असा ठपका न्यायालयाने ठेवला आहे.
हाताला धरून खेचणे हा महिलेचा विनयभंग, न्यायालयाचा निर्णय

मुंबई : कोणत्याही महिला किंवा मुलीच्या हाताला धरून तिला खेचून नेले तर त्यामुळे त्या मुलींचा किंवा महिलेचा विनयभंग होतो, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

शाळेच्या गेटबाहेर असलेल्या दोन अल्पवयीन शाळकरी मुलींच्या दंडाला धरून त्यांना पळविण्याच्या उद्देशाने खेचून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींची अपील याचिका न्यायालयाने फेटाळली. आरोपींनी लैंगिक शोषण करण्यासाठी मुलींचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला, असा ठपका न्यायालयाने ठेवला आहे. औरंगाबाद उच्च न्यायालयाचे न्या. विभा कनकवाडी यांच्यापुढे आरोपींनी केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. 

शाळेमध्ये झेंडावंदनासाठी जाणाऱ्या 16 आणि 14 वर्षांच्या दोन शाळकरी मुलींचे अपहरण करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला होता. विद्यार्थिनींनी त्यांना प्रतिबंध केला; मात्र तरीही ते मुलींना ओढून न्यायचा प्रयत्न करीत होते. मुलींनी आरडाओरडा केल्यावर शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी, विद्यार्थी बाहेर आले आणि त्यांनी मुलींची सुटका केली. आरोपींना पकडले. 

सत्र न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवून सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात अपील याचिका केली होती; मात्र न्यायालयाने याचिका फेटाळली. मुलीच्या हाताला धरून त्यांना खेचून नेणे हा भादंवि कलम 354 "अ'नुसार विनयभंगाचा गुन्हा आहे. त्यामुळे आरोपींची शिक्षा कायम ठेवत आहे, असे न्यायालय म्हणाले.

महिलांविरोधात होणारे गुन्हे वाढत आहेत. त्यामुळे अशा आरोपींना दया न दाखविता त्यांना कठोर शासन व्हायला हवे, असे नमूद करून शिक्षा कमी करण्याची आरोपींची मागणीही अमान्य केली. तसेच संबंधित विद्यार्थिनी अल्पवयीन असल्यामुळे पॉक्‍सो कायद्याचा गुन्हाही लागू झाला आहे. अल्पवयीन मुलांचे संरक्षण करण्यासाठी हा कायदा आहे. त्यामुळे शिक्षा रद्द होऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आणि याचिका नामंजूर केली.  


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com