कंगनाला `उखाड दिया`, असा इशारा दिल्याने संजय राऊतही प्रतिवादी!

कंगनाची याचिका दंडासह फेटाळण्याची मागणी महापालिकेच्या वतीने करण्यात आली आहे; तर कंगनानेही महापालिकेकडून दोन कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे.
sanjay raut-kangna.jpg
sanjay raut-kangna.jpg

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावतच्या पाली हिल कार्यालयातील बेकायदा बांधकामासंबंधित याचिकेत आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना प्रतिवादी करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने आज दिली. राऊत यांनी दिलेल्या कथित इशाऱ्यानंतर मुंबई महापालिकेने कारवाई केली, असा दावा कंगनाने केला आहे. यामुळे कंगना विरुद्ध राऊत सामना आता न्यायालयात रंगणार आहे.

न्यायालयाच्या या निर्णयानंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना मराठी अभिमानासाठी आणि महाराष्ट्र बाण्यासाठी मी अनेक केसेस अंगावर घेतल्या आहेत. त्यामुळे या केसमुळे त्यापासून तसूभरही ढळणार नसल्याचे म्हटले आहे.

न्या. शाहरूख काथावाला आणि न्या. रियाज छागला यांच्या खंडपीठापुढे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. कंगनाच्या वतीने ऍड. बीरेंद्र सराफ यांनी शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते राऊत यांची एक डीव्हीडी न्यायालयात दाखल केली. यामध्ये कंगनाच्या "पीओके' संबंधित विधानाबाबत टिप्पणी करण्यात आली आहे. तिला (उखाड दिया) इशारा दिला आहे, असे सराफ यांनी सांगितले. जर डीव्हीडीवरून आरोप करायचे असतील, तर त्यासाठी संबंधित व्यक्तीचीही बाजू ऐकणे आवश्‍यक आहे, असे मत खंडपीठाने व्यक्त केले. तसेच एच प्रभागाचे महापालिका अधिकारी भगवान लाटे यांच्यावरही कंगनाने व्यक्तिशः आरोप केले आहेत. त्यामुळे त्यांनाही प्रतिवादी करण्याची परवानगी खंडपीठाने दिली.

कंगनासह अन्य काहीजणांना महापालिकेने नोटीस दिली आहे. यामध्ये फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रासह अन्य काही जणांचा समावेश आहे. या व्यक्तींना किती दिवसाची मुदत दिली होती आणि त्यांच्यावर काय कारवाई केली, असे न्यायालयाने महापालिकेला विचारले आहे. कंगनाने नवीन मुद्दे याचिकेत नमूद केले आहेत. त्यावर लेखी खुलासा करण्यासाठी गुरुवारपर्यंत अवधी देण्याची मागणी ऍड. एस्पी चिनॉय यांनी केली. न्यायालयाने ही मागणी मान्य केली. कंगनाने याचिकेत म्हटले आहे, की बंगल्यात काही वर्षांपूर्वी बदल केले होते; मात्र आता म्हणते की बदलच केले नाहीत. यामुळे तिच्या विधानात विसंगती आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला.

कंगनाची याचिका दंडासह फेटाळण्याची मागणी महापालिकेच्या वतीने करण्यात आली आहे; तर कंगनानेही महापालिकेकडून दोन कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे. याचिकेवर उद्या नवीन पक्षकारांबाबत पुढील सुनावणी होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com