चिपळूण जलमय, ढगफुटीने हाहाकार; 2005च्या पुनरावृत्तीची भीती   - Heavy rains in Chiplun city-arj90 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

चिपळूण जलमय, ढगफुटीने हाहाकार; 2005च्या पुनरावृत्तीची भीती  

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 22 जुलै 2021

रात्रभर मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने शहराला पाण्याचा वेढा पडला आहे.

रत्नागिरी : ढगफुटीमुळे (Heavy rain) चिपळुणात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहरात पाणी शिरले आहे. शहरातील बाजारपेठ ,खेर्डीमध्ये मध्ये पाच फुटापेक्षा जास्त पाणी असून बाजारपेठ पाण्याखाली आहे. घरांमध्ये पुराचे पाणी शिरले असून मुंबई-गोवा महामार्ग, कराड रोड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. शहरातील ब्रिटिशकालीन बहादूर शेख पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अनेक घरांमध्ये छपरापर्यंत पाणी आल्याने हजारो लोक पाण्यात अडकले आहेत. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी तातडीने मदत पाठवण्यीच मागणी केली आहे. तसेच पाच हजार लोकांचे स्तलांतर करावे लागणार असल्याचे, राऊत यांनी सांगितले. (Heavy rains in Chiplun city) 

शहरातील जुना बाजार पुल आणि नवा पूल हे पूर्ण पाण्याखाली गेले असून दिसेनासे झाले आहेत. रात्रभर मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने शहराला पाण्याचा वेढा पडला आहे. वाशिष्टी आणि शिवनदीला आलेल्या पुराच्या पाण्याची पातळी वाढत आहे. रॉयल नगर तसेच राधाकृष्ण नगर मधील घरांमध्ये पाणी शिरले असून अनेकांच्या चारचाकी व दुचाकी पाण्याखाली गेली आहेत. अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर अनेक जण घरात अडकले आहेत. 

मदत कार्याला सुरुवात

रत्नागिरीहून चिपळूसाठी स्पीड बोट रवाना करण्यात आली आहे. एनडीआरएफ आणि कोस्ट गार्डची टीमही चिपळूणात दाखल होणार आहे. कोस्ट गार्ड हॅलिकॅाप्टरच्या सहाय्याने लोकांना रेस्क्यू करणार आहे. पुढील आठवडा पुरेल इतका अन्न धान्यांची व्यवस्था करणार करण्यात येत आहे. जिवितहानी होऊ नये म्हणून स्थानिक प्रशासनाला आदेश देण्यात आले आहे. कोकणातले सर्वच महत्वाचे नेते चिपळुणात होणार दाखल आहेत. वाशिष्ठी, शिवनदीच्या पुराच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 

2005 च्या पुनरावृत्तीची नागरिकांना भीती

पहाटे पासून शहरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरू लागले आणि अवघ्या दोन तासात कंबरभर पाणी झाले. शहरालगतच्या खेर्डी मध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरले असून अनेक घरे पाण्याखाल गेली आहेत. घरातील काही लोक या पुरात अडकले असून त्यांना मदतीची प्रतीक्षा आहे. बाजारपेठेत कंबरभर पाणी असून चिपळून खेडी मध्ये 2005 ची पुनरावृत्ती होते. की काय अशी भीती असून आता या पुराने 2005 चीपातळी गाठली आहे. याशिवाय पावसाचा जोर वाढत असून पाणी पातळीत वाढत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

Edited By - Amol Jaybhaye

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख