राऊतांविरोधातील त्या महिलेच्या याचिकेवरील निकाल कोर्टाने राखून ठेवला - Hearing on petition against Sanjay Raut completed; Court reserved judgment-vd83 | Politics Marathi News - Sarkarnama

राऊतांविरोधातील त्या महिलेच्या याचिकेवरील निकाल कोर्टाने राखून ठेवला

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 22 जुलै 2021

राऊत आणि स्वप्ना पाटकर यांच्या पतीमुळे जीवाला धोका असल्याचा आरोप महिलेने केला आहे.

मुंबई : शिवसेनेचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मानसोपचारतज्ज्ञ महिलेने केलेल्या याचिकेवरील सुनावणी गुरुवारी (ता. २२ जुलै) पूर्ण झाली. त्यावरील निकाल मात्र मुंबई उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. (Hearing on petition against Sanjay Raut completed; Court reserved judgment)

मुंबई पश्चिम उपनगरातील डॉक्टर असलेल्या एका महिलेने खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राऊत आणि स्वप्ना पाटकर यांच्या पतीमुळे जीवाला धोका असल्याचा आरोप महिलेने केला आहे.

याबाबत तीन फौजदारी गुन्हे दाखल केले होते. परंतु मुंबई पोलिसांवर राजकीय दबाव असल्यामुळे त्यांनी कारवाई केली नाही, असा युक्तिवाद ॲड आभा सिंह यांनी याचिकादाराकडून केला होता. मनसुख हिरेन हत्या आणि निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे याचा उल्लेखही सिंह यांनी केला. पाटकर यांच्या जीवालाही धोका होऊ शकतो, असा युक्तिवादही ॲड आभा सिंह यांनी केला. दंडाधिकारी न्यायालयात पोलिसांनी अहवाल दाखल केला आहे, असेही त्यांनी सांगितले. 

हेही वाचा : शिवसेना नगरसेवकाची भाजपच्या बैठकीला उपस्थिती

खासदार राऊत यांच्या वतीने या आरोपांचे खंडन न्यायालयात करण्यात आले. याचिकादार आणि राऊत यांचे नाते वडील-मुलीसारखे आहे. जेव्हा त्यांच्यावर हल्ला झाला, तेव्हा त्यांना पोलिस संरक्षणही दिले होते, असे ॲड. पी. के. ढाकेफाळकर यांनी सांगितले. न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने यावर निकाल राखून ठेवला आहे. 

पाटकर यांना पोलिसांनी बोगस डिग्री प्रकरणात अटक केली आहे. यामध्ये जामीन मिळण्यासाठी आणि गुन्हा रद्द करण्यासाठी पाटकर यांनी आणखी एक याचिका केली आहे. सोमवारी यावर सुनावणी होणार असून याचिकेत महिलेच्या पतीला पक्षकार करण्याची मुभा खंडपीठाने दिली आहे. सुनावणी होईपर्यंत महिलेला जामीन मंजूर करावा, अशी मागणी सिंह यांनी केली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख