राज्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढतेय; मृत्यूदर ४ टक्क्यांवर  - health minister rajesh tope addresses press  | Politics Marathi News - Sarkarnama

राज्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढतेय; मृत्यूदर ४ टक्क्यांवर 

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 17 मार्च 2021

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती 

मुंबई: राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली असून सद्यस्थितीत १ लाखाच्या घरात रुग्णसंख्या आहे. ८५ टक्के रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. आयसीयूमधील रुग्णांचे प्रमाण ३ टक्के असून मृत्यूदर ४ टक्के आहे. रुग्णसंख्या वाढली असली तरीदेखील परिस्थिती आटोक्यात असून घाबरण्यासारखी कोणतीही परिस्थिती नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

टोपे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत दोन तास चर्चा झाली. राज्यात सर्वात जास्त कोरोनाच्या चाचण्या होत असून त्यामुळे राज्यातील कोरोनाची संख्या वाढल्याचे प्रथमदर्शनी दिसते. महाराष्ट्रातील आरटीपीसीआर चाचणी दर ७० टक्क्यांपेक्षा अधिक असून पंतप्रधानांना हाच आकडा अपेक्षित होता, असेही टोपे म्हणाले. 

लसीबाबत बोलताना टोपे म्हणाले, मंगळवारी तब्बल २ लाख ३२ हजार जणांना लस दिली असून हे प्रमाण दररोज ३ लाख लशींपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. दर आठवड्याला २० लाख डोस देणे अपेक्षित असल्याचा ट्विट केंद्रीय मंत्र्यांनी केला आहे. १०० बेड किंवा त्यापेक्षा अधिक बेड असलेल्या रुग्णालयांमध्येच लस परवानगी द्यावी, ही जाचक अट काढून टाकावी, अशी मागणी केल्याचेही टोपे यांनी सांगितले.

नव्याने दीडशे रुग्णालयांची यादी लशींच्या मान्यतेकरिता पाठवली आहे. भारत बायोटेक यांनी जे तंत्र वापरले, ती जर हाफकीनला दिली तर आम्ही त्याचे उत्पादन सुरू करू, अशी मागणी पंतप्रधानांकडे केली आहे, अशी माहितीही टोपे यांनी दिली. राज्यात मायक्रो कंटेन्मेंट झोन करावे व त्यांची जाणीवपूर्वक माहिती द्यावी, असेही टोपे यांनी सूचित केले.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख