राज्याचे प्रमुख घरात बसले; मात्र फडणवीसांनी जनतेला धीर दिला  - The head of state sat in the house; But Fadnavis reassured the people | Politics Marathi News - Sarkarnama

राज्याचे प्रमुख घरात बसले; मात्र फडणवीसांनी जनतेला धीर दिला 

सरकारनामा ब्यूरो 
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

कोरोना विषाणूची लागण झाल्यावर फडणवीस यांनी पंचतारांकित रुग्णालयांकडे पाठ फिरवून सरकारी रुग्णालयातच उपचार घेतले.

मुंबई : "बोलून दाखविल्याप्रमाणे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना विषाणूची लागण झाल्यावर पंचतारांकित रुग्णालयांकडे पाठ फिरवून सरकारी रुग्णालयातच उपचार घेतले. असे करून त्यांनी एकप्रकारे सरकारी यंत्रणेवर विश्वास दाखविला, त्यांनी बोललेले करून दाखविले,' असे कौतुकोद्‌गार विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज (ता. 31 ऑक्‍टोबर) येथे काढले. 

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची कोरोनाकाळातील तसेच एकंदर कामे यांचा समावेश असलेल्या जनसेवक विशेषांकाचे प्रकाशन आज दरेकर यांच्या हस्ते आणि पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच जनसेवक विशेषांकाचे अतिथी संपादक माधव भांडारी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते म्हणून राज्यभर आपद्‌ग्रस्तांना धीर देण्यासाठी केलेल्या दौऱ्यांचा अनुभवही या वेळी दरेकर यांनी या वेळी सांगितला. 

निसर्ग चक्रीवादळ असो, अतिवृष्टी असो किंवा कोरोनाप्रसंगी कोविड सेंटरला दिलेल्या भेटी असोत, फडणवीस यांनी प्रत्येक संकटप्रसंगात जनतेमध्ये प्रत्यक्ष फिरून त्यांच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्यांना न्याय मिळवून दिला. त्यामुळे फडणवीस हे देखील खऱ्या अर्थाने कोविडयोद्धे आणि जनसेवक आहेत. फडणवीस यांच्या सामाजिक कार्याची नोंद घेऊन प्रकाशित करण्यात आलेला "जनसेवक' हा विशेषांक पुढच्या पिढीला नक्कीच प्रेरणादायी व दिशादर्शक ठरेल, असा विश्वासही दरेकर यांनी व्यक्त केला. 

राज्य सरकारची यंत्रणा सर्वच स्तरावर अपयशी ठरत असताना फडणवीस यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता राज्यातील कोविड सेंटरचा दौरा केला. ज्यावेळी प्रशासनाचे प्रमुख घरी बसले होते, तेव्हा फडणवीस यांनी संकटात सापडलेल्या जनतेला धीर दिला. निसर्ग चक्रिवादळ तसेच अतिवृष्टी या संकटसमयीदेखील ते प्रत्यक्ष घटनास्थळी गेले. त्यांनी अविरत परिश्रम करून राज्यातील जनतेला धीर दिला. त्यांच्या या सामाजिक कार्याची नोंद घेणारा हा विशेषांक म्हणजे एका अर्थाने जनतेच्या वतीने त्यांच्या योगादनाप्रति व्यक्त केलेली कृतज्ञता आहे, असेही विरोधी पक्षनेते दरेकर म्हणाले. 

अन्य राजकीय नेते कोरोना झाल्यावर पंचातारांकित रुग्णालयात उपचार घेत असताना देवेंद्र फडणवीस यांनी सेंट जॉर्ज या सरकारी रुग्णालयात उपचार घेणे पसंत केले. त्यांनी बोललेले करून दाखवले, एका प्रकारे त्यांनी सरकारी यंत्रणेवर विश्वास दाखविला, असेही दरेकर यांनी दाखवून दिले. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख