बेळगाव सीमाप्रश्न कधीच संपलाय! कुमारस्वामींचे आगीत तेल... - HD Kumarswami says Maharashtra people unnecessarily interfering into belgavi issue | Politics Marathi News - Sarkarnama

बेळगाव सीमाप्रश्न कधीच संपलाय! कुमारस्वामींचे आगीत तेल...

वृत्तसंस्था
सोमवार, 15 मार्च 2021

मागील काही दिवसांपासून बेळगाव सीमाप्रश्नाचा मुद्दा चांगलाच तापला आहे.

बेळगाव : मागील काही दिवसांपासून बेळगाव सीमाप्रश्नाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. दोन्ही राज्यातील नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी बेळगावमधील शिवसेनेच्या कार्यालयाची मोडतोड करून जिल्हाप्रमुखांवर हल्ला करण्यात आला. आज कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी महाराष्ट्रातील लोकांनी या मुद्यावर विनाकारण ढवळाढवळ करू नये, असे वक्तव्य केले आहे. 

पोलिसांच्या उपस्थितीत शिवसेनेचे बेळगाव जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या वाहनावर कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी भ्याड हल्ला केल्याने सीमाभागात संतापाची लाट उसळली आहे. भ्याड हल्ला केल्यानंतर शिवसेनेचा फलक मोडुन काढण्यात आला तसेच वाहनाला काळे फासण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या मराठी भाषिकांनी कन्नड गुंडाना तातडीने अटक करण्याची मागणी केली. 

बेळगावच्या सीमावादावरून कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी काही दिवसांपूर्वीच मुक्ताफळे उधळली आहेत. मुंबई प्रांत पूर्वी कर्नाटकात होता. त्यामुळे महाराष्ट्राने बेळगाव घेऊन मुंबई कर्नाटकाला द्यावी, अशी अजब मागणी त्यांनी केली. तर एका मंत्र्याने महाराष्ट्र एकीकरण समितीवरच बंदी घालण्याचे वक्तव्य केले आहे. कर्नाटकचे वस्त्रोद्योगमंत्री श्रीमंत पाटील यांनीही समितीवर बंद घालण्याचे वक्तव्य केले आहे. सर्वोच्च न्यायालयात दावा सुरू असला तरी सीमाप्रश्‍न हा संपलेला अध्याय आहे, असे ते म्हणाले होते. कर्नाटकचे दुसरे उपमुख्यमंत्री यांनीही कर्नाटकात राहणारे सर्व कनडगी असल्याचे वक्तव्य करून मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळले होते. 

हेही वाचा : प्रत्येक कुटूंबातील एकाला सरकारी नोकरी, सहा सिलेंडर अन् बरंच काही

तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्वव ठाकरे यांनी बेळगाव महाराष्ट्रात घेणारच, अशी गर्जना काही दिवसांपूर्वी केली होती. तसेच सीमावादाचा प्रश्न संपेपर्यंत हा भाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्याची मागणीही त्यांनी केली होती. बेळगाव सीमावादाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये असूनही कर्नाटक सरकारने बेळगावचे नामांतर केले. हा उर्मटपणा आहे. हे सरकार बदललेल्या नावाप्रमाणेच बेलगाम असल्याचा टोला ठाकरे यांनी लगावला होता.

हेही वाचा : पीपीई कीटमध्ये तो व्यक्ती सचिन वाझे? एनआयएकडून तपास सुरू

आता कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनीही या वादात उडी घेतली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, बेळगाव सीमा मुद्यावर महाराष्ट्रातील लोक विनाकारण का ढवळाढवळ करत आहेत. काही वर्षांपूर्वीच हा मुद्दा संपला आहे. सामान्य माणसांना याचा त्रास होत आहे. आमचे सरकारही पंतप्रधानांना यामध्ये मध्यस्थी करण्यास का सांगत आहे? या मुद्यावर कुणीच मध्यस्थी करू शकणार नाही, असे स्पष्ट मत कुमारस्वामी यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, बेळगाव सीमाप्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत. न्यायालयामध्ये महाराष्ट्राकडून बाजू मांडली जात आहे. न्यायालयाकडून घेण्यात येणाऱ्या निर्णयावरच बेळगावचे भवितव्य अवलंबून आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही काही दिवसांपूर्वी भाष्य केले होते.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख