'यूपी'मे हाहाकार; 'फोटोशूट'मे योगी सरकार ! : नितीन राऊतांचा हल्लाबोल  - Hahakar in 'UP'; Yogi Sarkar in 'Photoshoot'! : Nitin Raut's attack | Politics Marathi News - Sarkarnama

'यूपी'मे हाहाकार; 'फोटोशूट'मे योगी सरकार ! : नितीन राऊतांचा हल्लाबोल 

सरकारनामा ब्यूरो 
शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020

मुख्यमंत्री योगी हे फोटोशूट करत असल्याचा तो फोटो आहे.

पुणे : "उत्तर प्रदेशमध्ये दिवसाढवळ्या पोलिसांसमोर खून होत आहेत. पंधरा वर्षांच्या मुलींवर सामूहीक अत्याचार, तर महिलांवर हल्ले होत आहेत. "यूपी'त असे असुरक्षित वातावरण असताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आपली प्रतिमा उजळविण्यासाठी फोटोशूटमध्ये व्यस्त आहेत.

इतका बेजबाबदार मुख्यमंत्री "यूपी'ला प्रथमच मिळाला आहे. हे सर्व लाजिरवणे आहे,' अशा शब्दांत कॉंग्रेसच्या अनुसुचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी योगी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 

उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील एका दलित युवतीवर सामूहीक अत्याचार करून तिची जीभ छाटण्यात आली होती. उपचारादरम्यान तिचा दिल्लीतील रुग्णालयात मृत्यू झाला होता. त्यानंतर तिच्यावर मध्यरात्री कुटुंबातील सदस्यांच्या अनुपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्या प्रकरणावरून देशभरातून योगी सरकारवर टीकेची झोड उठली होती. 

त्याचदरम्यान यूपीत सामूहीक अत्याचाराच्या घटना घडल्या होत्या. तत्पूर्वी पत्रकारांनाही मारहाण करण्यात आली होती. हाथरस प्रकरणानंतर अत्याचार झालेल्या युवतीच्या कुटुंबीयांना राजकीय नेत्यांना भेटण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यावेळी देभरातून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजप यांचा विरोधकांकडून खरपूस शब्दांत समाचार घेण्यात आला होता. 

या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर राऊत यांनी एक फोटो ट्विट करत योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री योगी हे फोटोशूट करत असल्याचा तो फोटो असून त्याच्या सोबत "प्रदेश में हो रहा हाहाकार; फोटोशूट में व्यस्त योगी सरकार' अशी स्लोगन वापरण्यात आली आहे. 

"यूपी में दिनदहाड़े पुलिस के सामने हत्या हो रही है। 15 साल की बच्चियों के साथ गैंगरेप हो रहे। महिलाओं पर हमले हो रहे लेकिन इन सबसे बेखबर योगी आदित्यनाथ अपनी छवी चमकाने में जुटे है। यूपी को इतना गैरजिम्मेदार सीएम पहली बार मिला है। शर्मनाक।' असे ऊर्जामंत्री राऊत यांनी ट्विट केले आहे. 

हेही वाचा : तमिळनाडूत दलित सरपंचाचा अवमान; नितीन राऊतांनी लिहिले राज्यपालांना पत्र 

मुंबई : तमिळनाडूमध्ये दलित सरपंचांचा अवमान करणारा उपसरपंच व ग्रामपंचायतीच्या अन्य सदस्यांविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी  राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली आहे. 

तमिळनाडूच्या कुडलोर जिल्ह्यातील थेरकू ग्रामपंचायतीत हा प्रकार घडल्याचा व्हिडिओ नुकताच समाज माध्यमांवर प्रसिद्ध झाला होता. भविष्यात अशा घटना घडू नयेत, या साठी ऍट्रोसिटी कायद्यातील कलमांची काटेकोर अंमलबजावणी करावी. त्याचप्रमाणे दलितांविरुद्ध होणारा भेदभाव दूर करण्यासाठी सामाजिक जनजागृती मोहीम राबवावी, अशी मागणीही राऊत यांनी तमिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. 

Edited By vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख