राज्यपालांचं गोव्याला जायचं आधीच ठरलं होतं!

राज्यपालांनी भेटीची वेळ देऊनही पळ काढल्याची टीका शेतकरी नेत्यांनी केली आहे.तर राज्यपालांना कंगना राणावतला भेटायला वेळ आहे, पण शेतकऱ्यांसाठी वेळ नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला.
The governor had already informed that he would go to Goa says rajbhavan Explanation
The governor had already informed that he would go to Goa says rajbhavan Explanation

मुंबई : राज्यपालांनी भेटीची वेळ देऊनही पळ काढल्याची टीका शेतकरी नेत्यांनी केली आहे. मात्र, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आज गोवा विधानसभेच्या प्रथम सत्राला संबोधित करणार असल्याने शेतकरी शिष्टमंडळास भेटू शकणार नाहीत, असे आधीच कळविण्यात होते. त्यामुळे राज्यपालांनी शिष्टमंडळाला भेटीची वेळ देऊन भेट दिली नाही, हे वृत्त चुकीचे आहे, असे राज भवनकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

नव्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी संयुक्त किसान सभेने मुंबईत मोर्चाचे आयोजन केले होते. आंदोलनानंतर शेतकरी संघटनांचे शिष्टमंडळ राज्यपालांना निवेदन देण्यासाठी राजभवनात जाणार होते. पण राज्यपाल गोव्यात असल्याचे समजल्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त केली. राज्यपालांनी गोव्याला पळ काढल्याची टीका शेतकरी नेते अजित नवले यांनी केली. तर राज्यपालांना कंगना राणावतला भेटायला वेळ आहे, पण शेतकऱ्यांसाठी वेळ नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला. त्यानंतर राजभवनकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे गोवा राज्याच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. दिनांक 25 जानेवारी रोजी ते गोवा विधानसभेच्या प्रथम सत्राला संबोधित करणार असल्याने राज्यपाल महोदय त्यादिवशी शेतकरी शिष्टमंडळास भेटू शकणार नाहीत, असे राजभवनातून अगोदरच स्पष्ट करण्यात आल्याचे आज राजभवनकडून स्पष्ट करण्यात आले होते. 

संयुक्त शेतकरी मोर्चाचे धनंजय शिंदे यांना दिनांक 22 जानेवारी रोजी दुरध्वनी द्वारे तसेच निमंत्रक प्रकाश रेड्डी यांना दिनांक 24 जानेवारी रोजी लेखी पत्राद्वारे राज्यपालांच्या अनुपलब्धतेबद्दल कळविण्यात आले होते. शिंदे यांनी व्हॉट्सअॅप संदेशाद्वारे निरोप मिळाल्याचे मान्य केले होते. तसेच प्रकाश रेड्डी यांना याबाबतचे लेखी पत्र दिनांक 24 जानेवारी रोजी प्राप्त झाले होते. त्यामुळे राज्यपालांनी शिष्टमंडळाला भेटीची वेळ देऊन भेट दिली नाही, हे वृत्त चुकीचे आहे, असे राजभवनातून स्पष्ट करण्यात आले आहे. 

राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार शिष्टमंडळाकडून दिनांक 25 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता निवेदन स्विकारतील असेदेखील धनंजय शिंदे यांना पुर्वीच कळविण्यात आले होते व तसेच स्वीकृत असल्याबद्दल त्यांनी संदेशाद्वारे कळविले होते, असे राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

शरद पवार यांची राज्यपालांवर टीका

राज्यभरातील लाखो शेतकरी आझाद मैदानावर जमले आहेत. त्यांच्यासमोर बोलताना शरद पवार म्हणाले की. राज्याभरातील शेतकरी निवेदन देण्यासाठी आलेले असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी गोव्यात जाऊन बसले आहेत. मागील वर्षी मुंबई महापालिकेने अभिनेत्री कंगना राणावतच्या घराचा काही भाग पाडल्यानंतर तिला भेटायला त्यांच्याकडे वेळ होता. परंतु, शेतकऱ्यांना भेटायला त्यांना वेळ नाही. 

महाराष्ट्राच्या इतिहासात असे राज्यपाल पाहिले नव्हते. लाखो लोक इथे आले आहेत आणि ते गोव्याला गेले आहेत. शेतकरी हे राज्यपालांना निवेदन देणार होते. शेतकऱ्यांची भेट घेणे हे राज्यपालांचे नैतिक कर्तव्य होते. मात्र, त्यांनी त्यांचे कर्तव्य पार पाडलेले नाही, असेही पवार म्हणाले.  

घटनेकडे दुर्लक्ष करुन तुम्ही कायदे संमत करु शकता मात्र, यातून तुम्ही संसदेची प्रतिष्ठा आणि संसदीय व्यवस्था नष्ट करीत आहात. ज्यावेळी देशातील सामान्य माणून आणि शेतकरी जागा होईल त्यावेळी तो तुम्हाला उध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. मग तुम्ही कायदे मागे घ्या अथवा नाही. कोणत्याही चर्चेशिवाय कृषि विधेयके संमत करण्यात आली. हा देशाच्या घटनेचा अपमान आहे, असा हल्लाबोलही पवारांनी केला. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com