ठाकरेंच्या खिशात पाच दिवस असलेला राजीनामा राज्यपालांकडून पाच मिनिटांत मंजूर  - Governor Bhagat Singh Koshyari accepts the resignation of Sanjay Rathod | Politics Marathi News - Sarkarnama

ठाकरेंच्या खिशात पाच दिवस असलेला राजीनामा राज्यपालांकडून पाच मिनिटांत मंजूर 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 4 मार्च 2021

संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शनिवारी (ता. २८ फेब्रुवारी) पदाचा राजीनामा दिला होता.

मुंबई : पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात अडचणीत आलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा मंत्रीपदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज मंजूर केला. राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शनिवारी (ता. २८ फेब्रुवारी) पदाचा राजीनामा दिला होता. पण हा राजीनामा राज्यपालांकडे न पाठविल्याने विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका केली होती. पाच दिवसानंतर आज मुख्यमंत्र्यांनी राजीनाम्यावर सही करत तो राज्यपालांकडे पाठिवला. हा राजीनामा राज्यपालांनी लगेच मंजूर केला. 

संजय राठोड यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर ते अनेक दिवस गायब होते. या प्रकरणावरुन विरोधी पक्ष असलेल्या भाजपने रान उठवले होते. राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांच्याकडून जोरदारपणे केली जात होती. राठोडांचा राजीनामा न घेतल्यास अधिवेशन चालू देणार नसल्याचा इशारा भाजपने दिला होता. त्यामुळे राठोड यांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढला होता. 

त्यामुळे अधिवेशनच्या आदल्यादिवशी शनिवारी राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सोपवला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेते राजीनामा फ्रेम करण्यासाठी दिला नसल्याचे वक्तव्यही केले होते. पण राठोड यांनी राजीनामा देऊनही त्यावर मुख्यमंत्र्यांनी सहीच केली नसून अद्याप राज्यपालांकडे पाठविला नसल्याचे समोर आले. त्यामुळे विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली. 

विधानसभेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत टीका केली. राजीनामा फ्रेम करून ठेवला असेल, अशी बोचरी टीका फडणवीस यांनी केली. तर शेलार यांनी राजीनामा फ्रेम केला नाही तरी चालेल पण कायद्याच्या फ्रेमवर्कनुसार त्यांच्यावरील गुन्हे फ्रेम केले जावेत, असे म्हटले होते. 

संजय राठोड यांचा राजीनामा घेतला तर तो मातोश्रीवर फ्रेम करून ठेवला आहे का? राजीनामा अजून राज्यपालांकडे का गेला नाही? असा प्रश्न भाजप आमदार संजय कुटे यांनी उपस्थित केला होता. अखेर आज दुपारी मुख्यमंत्र्यांनी राजीनाम्यावर स्वाक्षरी केली. त्यानंतर तातडीने हा राजीनामा राज्यपालांकडे पाठविला. राज्यपालांनी काही मिनिटांतच हा राजीनामा मंजूर केला आहे. त्यामुळे संजय राठोड यांची मंत्रीपदावरून गच्छंती झाली आहे. 

मागील जवळपास महिनाभरापासून पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण राज्यात गाजत आहे. संशयाची सूई संजय राठोड यांच्याकडे असल्याने मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मागणी विरोधकांकडून होत होती. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख