government provide funds for sidhharth college dhananjay munde says | Sarkarnama

सिध्दार्थ महाविद्यालयाच्या दुरुस्तीसाठी निधी देणार: धनंजय मुंडे

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 29 जुलै 2020

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हे स्वतःदेखील याच महाविद्यालयाचे विद्यार्थी होते.

मुंबई : सिध्दार्थ महाविद्यालयाच्या आनंदवन इमारतीच्या दुरुस्तीसाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन आज सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. 

या प्रश्नावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी हे आश्वासन दिले. तसेच सिद्धार्थ कॉलेजच्या मोडकळीस आलेल्या या वास्तूची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करण्याचेही मुंडे यांनी यावेळी मान्य केले. या शिष्टमंडळामध्ये आमदार भाई गिरकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे, मुंबई आरपीआय युवाचे अध्यक्ष रमेश गायकवाड,  सिध्दार्थ महाविद्यालयाचे प्राचार्य यु. एम. म्हस्के आदींचा समावेश होता. दरेकर यांनी सिध्दार्थ महाविदयालयाच्या वास्तूच्या दुरुस्तीसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. तसेच या वास्तूची काही दिवसांपूर्वी प्रत्यक्ष पाहणी केली होती.

फोर्ट येथील सिद्धार्थ कॉलेजच्या इमारतीत अनेक ठिकाणी पाणी गळत असून त्यामुळे इमारतीलाही धोका निर्माण झाला आहे. या इमारतीच्या विकासकामाचा सुमारे नऊ कोटी रुपयांचा प्रस्ताव सव्वा वर्षापासून मंत्रालयात प्रलंबित आहे, यासंदर्भांत आज ही बैठक झाली. हा निधी तात्काळ मिळाला नाही तर महाविद्यालयासमोर धरणे धरण्याचा इशाराही दरेकर यांनी दिला होता. दरेकर स्वतःदेखील याच महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. बाबासाहेब आंबेडकरांच्या या कॉलेजविषयी आपणासही आस्था असल्याचे सांगत मंत्री धनंजय मुंडे यांनी विकासकामांचा प्रलंबित प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन आजच्या बैठकीत दिले.

रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा

पुणे : भाजप शिवसेनेबरोबर एकत्र यायला तयार आहे, या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी समाचार घेतला आहे. सत्तेसाठी आसुसलेल्या चंद्रकांतदादांनी शिवसेनेत प्रवेश करू नये म्हणजे झालं, असा टोला त्यांनी हाणला आहे.

गेले काही दिवस उद्धव ठाकरे यांचे सरकार व नेतृत्वावार भाजपकडून जोरदार हल्ले सुरू आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी तर उद्धव ठाकरे यांचे सरकार पडण्याची वाट पाहणार असल्याचे जाहीर केले आहे, मात्र फडणवीस हे विधान केल्याच्या दुसऱ्याच दिवशी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आम्ही शिवसेनेबरोबर जावू शकतो, अशी भुमिका मांडली आहे. शिवसेनेने एकत्रित निवडणुका लढवून युतीचा, तसेच मोदींच्या व्होटबँकेचा फायदा घेतला नंतर ते विरोधकांबरोबर गेले, अशी खंतही पाटील यांनी व्यक्त केली आहे. चंद्रकांत पाटील हे शिवसेनेबरोबरच्या युतीचा विषय गांभिर्याने बोलत आहेत की फक्त चर्चेची राळ उडवून द्यायचा उद्देश आहे, हे अजून स्पष्ट झालेले नाही. यापार्श्वभुमीवर रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला आहे.

Edited by swarup jankar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख