govenment and other workers can go to Konkan for Ganeshotsav | Sarkarnama

गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना कोकणात जाता येणार

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 15 जुलै 2020

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना ई पास देण्याचे सरकारच्या विचाराधीन आहे.

मुंबई : कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यांतर्गत प्रवासावर निर्बंध असले, तरी मुंबई परिसरातील चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी कोकणात जाता येणार आहे. त्यासाठी चाकरमान्यांना ई पास देण्याचे सरकारच्या विचाराधीन आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी अधीर झालेल्या चाकरमान्यांसाठी बसची सुविधा, ई पासची व्यवस्था, क्वारंटाईनचा कालावधी, वैद्यकीय सुविधा या मुद्द्यांवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी मंगळवारी कोकणातील लोकप्रतिनिधींशी चर्चा केली. ही चर्चा आणि प्रशासनाची भूमिका याचा तपशील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला जाईल. त्यावर मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील, अशी माहिती परब यांनी बैठकीनंतर दिली. 

बैठकीला खासदार विनायक राऊत, सुनील तटकरे, आमदार योगेश कदम, भरत गोगावले, महापौर किशोरी पेडणेकर आदी उपस्थित होते; तर इतर आमदार व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या बैठकीत सहभागी झाले होते.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना परब म्हणाले, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोकणातील गणेशोत्सव कशा प्रकारे साजरा करता येईल यावर बैठकीत चर्चा झाली. मुंबईतील चाकरमानी कोकणात कसे जातील आणि त्यांची राहण्याची व्यवस्था हे दोन विषय होते. कोकणात गेल्यावर त्यांना क्वारंटाईन कुठे आणि कसे करायचे, यावर चर्चा झाली.

किंबहुना, कमीत कमी लोकांनी मुंबईतून कोकणात जावे असे आवाहन करायचे ठरले आहे. कारण दुर्दैवाने कोकणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर त्याचा सामना करण्यासाठी वैद्यकीय सुविधा किती आहे यावरही चर्चा झाली.

लोकप्रतिनिधींची मते आणि प्रशासनाची भूमिका याचा सारांश मुख्यमंत्र्यांकडे दिला जाईल. त्यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील. त्यानंतर चाकरमान्यांचा प्रवास आणि इतर गोष्टींवर चर्चा होऊन अंतिम निर्णय घेतला जाईल असे परब म्हणाले.

क्वारंटाईनच्या कालावधीवर चर्चा

कोकणात गेल्यावर चाकरमान्यांना किती दिवसांसाठी क्वारंटाईन केले जाईल ? या प्रश्‍नावर परब म्हणाले, आयसीएमआर आणि आरोग्य विभागाची मार्गदर्शक तत्त्वे तपासून पाहिली जातील. त्यामध्ये शिथिलता देता येईल का हे तपासले पाहिजे. या सर्वांची माहिती घेऊन त्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय जाहीर केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

बस प्रवासासाठी जिल्हाबंदी आणि ई पासेसच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना ते म्हणाले, की ई पास दिले तर कोकणात किती लोक गेले त्याचा आकडा समजेल. त्यादृष्टीने वैद्यकीय सुविधा द्याव्या लागतील. त्यासाठी कोकणात जाणाऱ्या लोकांची संख्या सरकारला माहिती असलीच पाहिजे.

बसची परवानगी
मुंबईतून कोकणात गेल्यावर अनेकांची घरे उघडावी लागतात. कोकणात गेल्यावर घराची साफसफाई, कोकणात जाण्यासाठी बसची व्यवस्था, बस प्रवासाची परवानगी आणि प्रत्यक्ष बस प्रवासाला परवानगी मिळाल्यावर बस उपलब्ध करून दिल्या जातील, असेही त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख