भिवंडीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत : एकनाथ शिंदे - Five lakh assistance to the families of the victims of the accident in Bhiwandi: Eknath Shinde | Politics Marathi News - Sarkarnama

भिवंडीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत : एकनाथ शिंदे

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

इमारत कोसळल्याचे वृत्त समजताच पालकमंत्री शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

ठाणे : भिवंडीतील पटेल कंपाउंड येथील जीलानी ही तीन मजली इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणार असल्याचे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. 

सोमवारी पहाटे पावणे चारच्या सुमारास ही इमारत कोसळून 10 जण मृत्युमुखी पडले, तर किमान 30 ते 35 जण अद्याप ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त होत आहे. 

इमारत कोसळल्याचे वृत्त समजताच पालकमंत्री शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. एनडीआरएफची एक तुकडी, ठाणे महापालिकेच्या आपत्कालीन विभागाची तुकडी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल आणि भिवंडी अग्निशमन दलाचे जवान पहाटेपासून मदतकार्यात गुंतले असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. 

जखमींना महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून शिंदे यांनी तिथेही भेट देऊन जखमींची विचारपूस केली, तसेच उपचारांबाबत डॉक्‍टरांकडून माहिती घेतली. या दुर्घटनेची चौकशी करण्यात येईल, असे श्री. शिंदे यांनी जाहीर केले. भिवंडी महापालिकेने शहरातील धोकादायक इमारती रिकाम्या केल्या असून अशा प्रकारच्या इमारतींचा आढावा सातत्याने प्रशासनाकडून घेतला जातो, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले. 

भिवंडीतल दुर्घटनेपूर्वी महाडमध्येही अशीच एख इमारत कोसळली होती. त्यावेळीही मंत्री एकनाथ शिंदे तेथे पोचले होते. या दुर्घटनेत दोन लहान मुले अनाथ झाली होती त्यांचे पालकत्व मंत्री शिंदे यांनी घेतले आहे. त्यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे चालवित असलेल्या ट्रस्टतर्फे या दोन मुलांची जबाबदारी घेण्यात आली आहे. 

हे ही वाचा :  
अदानी वीज कर्मचाऱ्यांच्या संपाला संघटनांचा विरोध? 

मुंबई,  अदानी इलेक्‍ट्रिसिटी मुंबई कंपनीतील कामगारांचे प्रलंबित प्रश्‍न मार्गी लागत नसल्याने मुंबई इलेक्‍ट्रिक वर्कर्स युनियनने संपावर जाण्यासाठी गुप्त मतदान घेतले. कोरोनाच्या काळात ग्राहकांना वेठीस धरू नये, यासाठी इतर सर्व कामगार संघटनांनी या संपाला विरोध केला आहे. यामुळे संपावरून आता संघटनांमध्येच जुंपणार आहे.

कामगारांच्या प्रश्‍नांवर संपावर जाण्यासाठी मुंबई इलेक्‍ट्रिक वर्कर्स युनियनने 12 सप्टेंबरला गुप्त मतदान घेतले. कोरोना महामारीचा प्रादुर्भाव असल्याने, अदानी आस्थापनात संपासाठी मतदान होणे योग्य नाही. यासाठी आस्थापनातील इतर नोंदणीकृत कामगार संघटनांनी विरोध दर्शविला होता. महाराष्ट्र विद्युत जनरल कामगार सेनेने कामगार आयुक्त कार्यालयाला या प्रकरणी पत्र लिहिले होते. 

या पत्राची दखल घेऊन, सहाय्यक कामगार आयुक्तांनी मुंबई इलेक्‍ट्रिक वर्कर्स युनियन बरोबर 11 सप्टेंबर रोजी ऑनलाईन सभा आयोजित करण्यात आली होती. ही सभा प्रत्यक्ष व्हावी अशी विनंती युनियन सरचिटणीस गायकवाड यांनी पत्राद्वारे केली होती. त्यामुळे ऑनलाईन सभा रद्द करून, सामाजिक अंतर राखून 3 ते 4 पदाधिकाऱ्यांची बैठक 18 सप्टेंबर रोजी घेण्यात येईल, त्यासाठी 10 सप्टेंबर रोजी दिलेले ऑनलाईन सभेचे पत्र रद्द करण्यात येत आहे, असे कळविले होते. 

त्यामुळे अदानी इलेक्‍ट्रिसिटी कंपनीत गुप्त मतदान घ्या, असे आदेश सहाय्यक कामगार आयुक्त यांनी न दिल्याने 12 सप्टेंबर रोजी गायकवाड यांनी घेतलेली गुप्त मतदान प्रक्रिया बेकायदेशीर ठरविली आहे, असे अदानी इलेक्‍ट्रिक विद्युत कामगार सेनेचे नेते गजानन रेवडेकर यांनी सांगितले. या बेकायदेशीर संपाला इतर संघटनांचा विरोध असल्याचेही ते म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख