अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात तक्रार दाखल  - Filed a complaint against Minorities Minister Nawab Malik | Politics Marathi News - Sarkarnama

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात तक्रार दाखल 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 19 एप्रिल 2021

रेमडेसिव्हीर इंजेक्शन वरून केंद्र सरकार विरोधात अफवा पसरवणाऱ्या व खोटी माहिती देऊन लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी तक्रार दाखल. 

मुंबई : रेमडेसिव्हीर इंजेक्शन वरून केंद्र सरकार विरोधात अफवा पसरवणाऱ्या व खोटी माहिती देऊन लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी, राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात अफवा पसरविल्याबद्दल तात्काळ, गुन्हा दाखल करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी सोमवारी दिंडोशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करत केली आहे. 

दोन दिवसांपूर्वी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारने रेमडेसिव्हीर उत्पादक कंपन्यांनी महाराष्ट्राला रेमडेसिव्हिर इंजेक्शन देऊ नये अन्यथा आपला परवाना रद्द करू, अशी धमकी दिली असल्याची खोटी माहिती दिली. केंद्र व राज्य सरकारमध्ये नाहक वाद निर्माण करून राष्ट्रीय एकतेला तडा जाईल असे वक्तव्य केले. इतकेच नव्हे तर प्रसारमाध्यमांना व समाज माध्यमातून अफवा पसरवून लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचे काम केल्याचा, आरोप भातखळकर यांनी केला आहे.

बाळासाहेब थोरोत यांच्या आढावा बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याकर्यांचा गोंधळ

या मुळे भयभीत होऊन हजारो लोक महाराष्ट्र सोडून जाण्यास सुरुवात झाली, रेल्वे स्टेशन, बस स्थानक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. यातून मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा फैलाव झाल्याची शक्यता आहे. मलिक यांचे हे कृत्य पूर्णपणे बेकायदेशीर असून महामारी रोग अधिनियम, 1897 नुसार गुन्हा असल्यामुळे नवाब मलिक यांच्यावर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा आमदार भातखळकर यांनी आपल्या तक्रारीत केली आहे. 

राज्य सरकारने पुढील 48 तासांत नवाब मलिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल न केल्यास याप्रकरणी उच्च न्यायालयात जाणार असल्याचा इशारा सुद्धा भातखळकर यांनी दिला आहे. नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीने अटक केली आहे. आणि ते त्यांना सोडत नसल्यामुळे मलिक असे आरोप करत असल्याचे ही भातखळकर म्हणाले.

काय म्हणाले होते नवाब मलिक?

"देशामध्ये सात कंपन्यांना रेमडेसिव्हिरचे देशांतर्गंत वाटप आणि विक्रीची परवानगी मिळाली आहे. अन्य दोन कंपन्यांना पदरेशात विक्रीची परवानगी आहे. 7 कंपन्यांना उत्पादनाची परवानगी आहे. निर्यातीवर बंदी घातल्यानंतर काही कंपन्या आमच्याकडे साठा उपलब्ध आहे. आम्हाला विकण्याची परवानगी द्या, यासाठी राज्य सरकारकडे मागणी करत आहेत.

ब्रुक फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया हे स्वत: अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना भेटले होते. त्यांनी माहिती दिली की, माझ्याकडे रेमडेसिव्हिरचा साठा आहे, मला परवानगी दिली तर हा साठा देऊ शकतो. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडे औषधांचा साठा आहे, त्या आधारे राजेश डोकानिया यांना बोलावून माहिती गोळी केली जात होती असे'', मलिक म्हणाले होते. 

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत 'करेक्ट कार्यक्रम' कुणाचा?
 

"देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर, आमदार प्रसाद लाड हे सर्वजण रात्री बीकेसीला पोहोचले. पोलिसांना माहिती मिळाली तर पोलिस त्यासंदर्भातील चौकशी करतात. या डोकानियाला सोडवण्यासाठी राज्याचे दोन-दोन विरोधी पक्षनेते आणि आमदार का गेले असा सवाल मलिक यांनी केला आहे.  रेमडेसिव्हिरचा साठा स्वतः कडे घेण्यासाठी आणि साठा सरकारला देऊ नका, अशी भूमिका भाजप नेत्यांची आहे. साठा देऊ शकतात त्यांना ऑर्डर द्या अशी भूमिका घेत आहेत. राजेश डोकानीया यांची चौकशी करुन त्यांना सोडून देण्यात आले आहे. तसेच त्यांना पुन्हा गरज भासल्यास चौकशीसाठी बोलावण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.", असे ही मलिक यांनी सांगितले होते.  

फडणवीस वकील आहेत, ते वकीलपत्र घेऊन बाजू मांडत होते? की त्यांचे संबंध आहेत म्हणून त्यांची बाजू मांडत होते? जर महाराष्ट्राच्या हितासाठी पोलिस यंत्रणा, एफडीए काम करत असेल आणि चौकशीसाठी बोलावले असेल तर भाजपचे प्रमुख नेते तिकडे जातात, यावरुन काय संबंध आहेत हा खुलासा केला पाहिजे." अशी मागणी ही मलिक यांनी केली होती.   

Edited By - Amol Jaybhaye 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख