'राष्ट्रीय तपास संस्थे'पेक्षा फडणवीसांना अधिक माहिती? - Fadnavis has more information than NIA? | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

'राष्ट्रीय तपास संस्थे'पेक्षा फडणवीसांना अधिक माहिती?

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 17 मार्च 2021

काँग्रेस नेते सचिन सावंत यांची खोचक प्रतिक्रिया 

मुंबई: गुन्हा जिथे घडला आहे, तिथे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस स्वतः उपस्थित होते का? फडणवीस यांच्याकडे राष्ट्रीय तपास संस्थेपेक्षा (एनआयए) अधिक माहिती असल्याचे दिसते. स्वतःची गुप्तहेर संस्था त्यांनी काढल्यास देशाला याचा फायदाच होईल, अशी खोचक प्रतिक्रिया काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी बुधवारी दिली. 

मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या झालेल्या बदलीनंतर फडणवीस यांनी बुधवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर सावंत यांनी ही खोचक प्रतिक्रिया दिली. सावंत पुढे बोलताना म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडणवीस यांना एनआयए प्रमुखपद बहाल करावे. पुलवामा हल्ला कसा आणि कुणी केला यावर फडणवीस तपास करून नक्कीच प्रकाश टाकतील, असेही सावंत यांनी सांगितले. 

तत्त्पूर्वी फडणवीस यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सचिन वाझे आणि शिवसेनेचा संबंध काय? असा सवाल करत निलंबित वाझे यांना पोलिस दलात पुन्हा घ्यावे, यासाठी २०१८ मध्ये आपण मुख्यमंत्री असताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोन आला होता, शिवाय त्यांचे काही मंत्री देखील माझ्याकडे आले होते असा गौप्यस्फोट केला. वसई-विरारमध्ये खंडणी मागणाऱ्यांचे जे रॅकेट सापडले होते, त्यामध्ये सचिन वाझे यांचे नाव होते. २००४ मध्ये खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यामुळे वाझे यांना उच्च न्यायालयाच्या आदेशाने निलंबित करण्यात आले होते. 

    

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख