मुंबई : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देेवेंद्र फडणवीस यांनी सुमारे अडीच तास जोरदार बॅटिंग करत महाआघाडी सरकारवर तुटून पडले. या प्रसंगी त्यांनी संत तुकारामांचा अभंग सांगून या सरकारबद्दलचा रोष व्यक्त केला.
नये दंतकथा येथे सांगू कोणी।
कोरडे ते मनी कोण बोल।। 1।।
अनुभव येथे पाहिजे साचार ।
न चालती हार आम्हापुढे।। 2।।
वारी कोण मनी रसाळ बोलणे ।
नाही ज्याने मने ओळखिली। ।।3।।
निवडी वेगळे दूध आणि पाणी ।
राजहंस दोन्ही वेगळाली ।।4।।
तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे ।
येर गबाळ्याचे काम नाही।।
राज्यपालांच्या अभिभाषणावर विधानसभेत उपस्थित चर्चेत त्यांनी राज्यपालांना विमान नाकारण्यापासून ते मुंबईतील मेट्रो कार डेपोबद्दल महाआघाडी सरकार कोतेपणाने वागत असल्याची टीका केली. यापूर्वी सुद्धा राज्यपाल आणि सरकार असे मतभेद झाले, पण इतका कोतेपणा कोणत्याही सरकारने कधीही दाखविला नाही.विमान नाकारणे हा प्रकार अधिकच गंभीर होता. राज्यपालांचे हे अभिभाषण म्हणजे केवळ पोकळ माहिती आहे. कोणतीही आकडेवारी त्यात नाही.
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ते मी जबाबदार’ हा प्रवास आरोग्य व्यवस्थेची थट्टा आहे. यमक जुळविणारी भाषा ही यशाचे गमक होऊ शकत नाही. केवळ शब्दांनी लोककल्याण साधत नाही. सातत्याने कमी चाचण्या केल्याने महाराष्ट्रात कोरोना वाढला. आजही अतिशय गंभीर स्थिती राज्यात आहे. महाराष्ट्रात सरकारने कोरोना नीट हाताळला असता तर ९,५५,००० रुग्ण कमी राहिले असते, ३०,९०० मृत्यू कमी झाले असते, असा दावा त्यांनी केला.
कोरोनाच्या काळात सुद्धा भ्रष्टाचार करण्याचेच काम झाले. प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणे कशाला म्हणतात, याचा अर्थ सरकारने समजावून सांगितला. कोव्हिड सेंटरमध्ये अनेक वस्तू अवाच्या सवा भावाने घेतल्याचा आरोप त्यांनी केला. कोरोनाकाळात सरकार केवळ फेसबुक लाईव्हमध्ये मग्न असल्याचे सांगत २१ फेब्रुवारी २०२१ चे फेसबुक लाईव्ह उत्तम होते. या लाईव्हमध्ये मख्यमंत्री म्हणाले की माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, पण तुमचा आवाज माझ्यापर्यंत येत नाही.नेमके हेच तर गेल्या सव्वा वर्षांपासून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत. पण, तुम्हीच सांगितले हे बरे केले, असा फडणवीस यांनी टोमणा मारला.
मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा फोन कोण टॅप करते आहे, हेही सांगा. मंत्री स्वतः ट्विट करतात आणि सकाळी डिलीट करतात.- पूजा चव्हाण प्रकरणात जितके पुरावे आहेत, तितके पुरावे कोणत्या प्रकरणात नसतील.तक्रार नाही म्हणून केस होत नाही असे कोण सांगते? खटला चालतो तेव्हा तो राज्य विरुद्ध आरोपी असा असतो. मेहबूब शेख केवळ राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून कारवाई नाही. स्वतः डीसीपी बचावासाठी पुढे येतात. इतका पोलिसांवर दबाव असल्याचे त्यांनी सांगितले.

