प्रताप सरानाईकांची चौकशी एमएमआरडीएच्या आयुक्तांपर्यंत पोहोचली... - ED Pratap Saranaik inquiry reaches MMRDA commissioner | Politics Marathi News - Sarkarnama

प्रताप सरानाईकांची चौकशी एमएमआरडीएच्या आयुक्तांपर्यंत पोहोचली...

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) एमएमआरडीएच्या आयुक्तांना समन्स बजावले आहे.

मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे गाजलेल्या टॉप्स सिक्‍युरिटी प्रकरणात आता सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) एमएमआरडीएच्या आयुक्तांना समन्स बजावले आहे. 2014 मध्ये टॉप्स ग्रुप व एमएमआरडीए यांच्यात झालेल्या कराराबाबतची माहिती त्यांच्याकडून घेण्यात येणार असल्याची माहिती ईडीतील सूत्रांनी दिली. 

तत्कालीन प्रमुख उरविंदर सिंग मदान निवृत्त झाल्यामुळे एमएमआरडीएतर्फे आयुक्त आर. ए. राजीव ईडी कार्यालयाला भेट देणार आहेत. एमएमआरडीएने याप्रकरणी निवेदन जारी केले आहे. टॉप्स ग्रुपशी संबंधित निविदा 2014-17 या कालावधीतील आहेत. त्या संबंधित पुरावे गोळा करण्यासाठी एमएमआरडीए प्रमुखांना समन्स बजावण्यात आले आहे. कंत्राटाचे स्वरूप, त्या वेळी मागवण्यात आलेल्या निविदा, त्यांची प्रक्रिया, करार करताना कोणते निकष वापरण्यात आले, कंत्राटाची रक्कम, कंपनीला देण्यात आलेली रक्कम, त्या बदल्यात देण्यात आलेल्या सुविधा आदींची माहिती घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

या प्रकरणात आतापर्यंत ईडीने दोघांना अटक केली आहे. त्यामध्ये अमित चांदोळे यांचा समावेश होता. 2020 डिसेंबरला ईडीने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना समन्स बजावले होते. त्यानंतर त्यांची चौकशीही करण्यात आली होती. 175 कोटींच्या कंत्राटासाठी 7 कोटींची लाच देण्यात आल्याचा आरोप टॉप्स सिक्‍युरिटीचे माजी कर्मचारी रमेश अय्यर यांनी केला होता. त्याप्रकरणी 28 ऑक्‍टोबरला तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता.

सुरक्षारक्षकांचा पूर्ण वापर नाही

टॉप्स सिक्‍युरिटीचे राहुल नंदा यांच्याकडून 100 पैकी केवळ 70 टक्के सुरक्षारक्षक वापरले जायचे. 30 टक्के सुरक्षारक्षकांचा वापर करण्यात येत नव्हता. जवळपास 150 च्या आसपास सुरक्षारक्षकांचा वापर केला जात नव्हता.  मात्र, तरीही त्यांची सगळी रक्कम टॉप्सच्या ग्रुपला मिळत होती. त्यातली काही रक्कम लाच देण्यात आल्याचा दावा ईडीने न्यायालयात केला होता.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख