मुंबई : उद्योजक व बॉलीवूड अभिनेता सचिन जोशी याला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) रविवारी अटक केली. त्यानंतर प्राप्तिकर विभागाने राबविलेल्या शोध मोहिमेत १५०० कोटी रुपयांचे बेहिशेबी व्यवहार आढळले. सचिन जोशी आणि त्याच्या कुटुंबाशी संबंधीत मुंबईसह देशातील विविध ठिकाणांवर शोध मोहीम राबविण्यात आली होती.
या वेळी १३ लाखांची रोकड, सात कोटी रुपयांचे दागिने सापडले. याबाबत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले. याशिवाय ११ ठिकाणांवरील १६ लॉकरवरही हे आदेश लागू करण्यात आले आहेत. याप्रकरणी प्राप्तिकर विभागाने सहा दिवस शोध मोहिम राबवली आहे. सर्वप्रथम ८ फेब्रुवारीला याला सुरूवात करण्यात आली. त्यात जोशी कुटुंबियांच्या जेएमजे हाऊसचाही समावेश होता. १३ फेब्रुवारीपर्यंत ही मोहिम सुरू होती.
याबाबत प्राप्तिकर विभागने दिलेल्या माहितीनुसार, या मोहिमेत परदेशी कंपनी ब्रिटिश व्हर्जिन आयलंड (बीव्हीआय) याच्याशी जोशीचा संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय या कंपनीचे दुबईत कार्यालय आहे. कंपनीची मूळ किंमत ८३० कोटी रुपये आहे. देशातील पैसा परदेशात नेण्यासाठी तिचा वापर केला गेला. तसेच समभाग अधिमूल्याच्या (प्रीमियम) माध्यमातून ६३८ कोटी रुपये परत भारतातही पाठविण्यात आल्याचे निष्पन्न झाले.
या कंपनीत समभाग असलेला एक कर्मचारीही सापडला आहे. त्याच्याकडून माहिती घेण्यात येत आहे. याप्रकरणी अनेक डिजिटल पुरावे प्राप्तीकर विभागाला सापडले आहेत. यासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेची मदत घेण्यात येणार आहे. याशिवाय दोन कारखान्यांमधून २४७ कोटी रुपयांच्या पान मसाल्याची बेहिशोबी निर्मिती झाल्याचेही निष्पन्न झाले. तसेच कंपनीकडून मिळविण्यात आलेली कर वजावटही संशयाच्या भोवऱ्यात आहे.
१०० कोटी रुपये मूल्याच्या काळ्या पैशाप्रकरणी सचिन जोशीचा सहभाग असल्याचा आरोप आहे.
सचिन जोशी हा गुटखा किंग व जेएमजे ग्रुपचे मालक जगदीश जोशी यांचा मुलगा आहे. पण २०१७ मध्ये विजय माल्या याचा बंगला खरेदी करून तो खूप चर्चेत आला होता. याशिवाय सचिन जोशीने टॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये सिनेमांची निर्मिती केली आहे. सचिन जोशीने श्रीलंकेतील क्रिकेट लीगमध्ये टीम खरेदी केली होती. अजान, मुंबई मिरार, जॅकपॉट, वीरप्पन, अमावस यासारख्या हिंदी सिनेमात काम केले आहे.
या अगोदरही सचिनविरोधात अंधेरी (पश्चिम मुंबई) येथील रहिवासी पराग संघवी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. संघवीला ५८ कोटी रुपयांचे स्वामित्व हक्क (रॉयल्टी) न दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याशिवाय ३० माजी कर्मचाऱ्यांचे वेतन न दिल्याचा आरोपही त्यांच्या कंपनीवर करण्यात आला होता.
Edited By - Amol Jaybhaye

