भाजप सरकारच्या कार्यकाळात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवला : चंद्रकांत पाटील

दूध आंदोलनाचा विषय राज्य सरकारच्या अखत्यारीत येत असूनही हा विषयही केंद्र सरकारच्या माथी मारण्याचा प्रयत्न हे सरकार करीत आहे.
भाजप सरकारच्या कार्यकाळात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवला : चंद्रकांत पाटील

मुंबई : दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार भाजप महायुतीच्या मंगळवारी (ता. ११) झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

 त्यानुसार पुढील टप्प्यात मुख्यमंत्र्यांना ५ लाख निवेदने देण्यात येणार आहेत, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.

दोन वेळा आंदोलन करूनही राज्य सरकारने दूध उत्पादकांना सरसकट अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला नाही. महायुतीच्या आंदोलनाला शेतकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद देऊन आपल्या मागण्या सरकारदरबारी मांडल्या. माध्यमांनीही या आंदोलनांची दखल घेतली; मात्र राज्य सरकारने गेंड्याची कातडी पांघरून या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले. 

दूध आंदोलनाचा विषय राज्य सरकारच्या अखत्यारीत येत असूनही हा विषयही केंद्र सरकारच्या माथी मारण्याचा प्रयत्न हे सरकार करीत आहे. यावरून राज्य सरकार कशा प्रकारे आपल्या जबाबदारीची चालढकल करीत आहे, हे दिसून येते, असे महायुतीतर्फे सांगण्यात आले . 

या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार महादेव जानकर, रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत, शिवसंग्राम संघटनेचे विनायक मेटे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) अविनाश महातेकर, भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रीतम मुंडे, भाजप प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, देवयानी फरांदे व भाजप प्रदेश किसान मोर्चा अध्यक्ष अनिल बोंडे उपस्थित होते. 

भाजप सरकारच्या कार्यकाळात दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य अनुदान देऊन त्यांचा प्रश्न सोडवला होता. आत्ताचे सरकारही यासाठी बांधील आहे. त्यामुळे हे दूध आंदोलन अधिकाधिक तीव्र करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना अनुदान मिळवून देण्यासाठी १३ ते १९ ऑगस्ट या कालावधीत विविध मागण्यांचे लेखी पत्र, ई-मेल, फोन कॉल किंवा इन्स्टाग्राम या विविध मार्गांनी ५ लाख निवेदने मुख्यमंत्र्यांना देऊन आंदोलन करण्यात येणार आहे. 
- चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप 

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com