मोठी बातमी : खासगी कार्यालयांमध्ये ५० टक्केच उपस्थिती...सरकारने निर्बंध वाढवले

मास्कशिवाय कुणालाही प्रवेश मिळणार नसल्याचा आदेश राज्य शासनाने काढला आहे.
Drama theatres & auditoriums to operate on 50 percent capacity in maharashtra
Drama theatres & auditoriums to operate on 50 percent capacity in maharashtra

मुंबई : राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने राज्य शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. आता राज्यातील सर्व खासगी कार्यालये, नाट्यगृह व सभागृहांमध्ये केवळ ५० टक्के उपस्थितीचे बंधन घालण्यात आले आहे. तसेच मास्कशिवाय कुणालाही प्रवेश मिळणार नसल्याचा आदेश राज्य शासनाने काढला आहे. 

राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाच्या नवीन रुग्णांचा दैनंदिन आकडा २५ हजाराच्या पुढे गेला आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून येत आहेत. केंद्र सरकारनेही याबाबत महाराष्ट्र सरकारला अधिक कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये स्थानिक पातळीवर प्रशासनाने लॉकडाऊन, संचारबंदी असे निर्णय घेतले आहेत. तसेच राज्य शासनाकडूनही आता निर्बंध वाढविले जात आहेत. 

शासनाने काढलेल्या आदेशानुसार, सर्व खासगी कार्यालयांमध्ये केवळ ५० टक्के कमचाऱ्यांची उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. यातून अत्यावश्यक सेवांची कार्यालये वगळण्यात आली आहेत. तसेच उत्पादन क्षेत्रालाही यातून सुट देण्यात आली आहे. मात्र, कोरोनाशी संबंधित सर्व नियमांचे पालन करण्याचे बंधन त्यांच्यावर असेल. तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांमधील उपस्थितीबाबत कार्यालय प्रमुखावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कोरोनाची स्थिती पाहून निर्णय घेण्याचे सुचना देण्यात आल्या आहेत. 

राज्यातील नाट्यगृह व सभागृहांमध्येही केवळ ५० टक्के उपस्थितीचे बंधन घालण्यात आले आहे. हे आदेश ३१ मार्चपर्यंत लागू असतील. त्याचप्रमाणे कार्यालये, नाट्यगृह व सभागृहांमध्ये प्रवेश करताना मास्कचे बंधन असेल. प्रवेश देताना प्रत्येक व्यक्तीच्या शरीराचे तपमान मोजणे आवश्यक आहे. ठिकठिकाणी हँड सॅनिटायझर ठेवण्याचे बंधनही घालण्यात आले आहे. स्थानिक व्यवस्थापनाने कोविड नियमांच्या पालन करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करण्याच्या सुचनाही शासनाने दिल्या आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास आस्थापन बंद करण्याचा तसेच दंडात्मक कारवाईचा इशाराही शासनाने दिला आहे. 

दरम्यान, राज्यात गुरूवारी कोरोनाचे २५ हजार ८३३ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. मागील वर्षी एका दिवसात २४ हजार ८९६ हा रुग्णांचा आकडा सर्वाधिक होता. राज्यात सर्वाधित रुग्ण पुणे जिल्ह्यात आढळून येत असून पुणे शहरात दैनंदिन रुग्णांचा आकडा अडीच हजारांवर पोहचला आहे. त्यामुळे पुणेकरांसह राज्याच्या चिंतेत भर पडत चालली आहे. पुण्यामध्ये केवळ रात्रीची संचारबंदी आहे. 

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com