ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर - Draft voter list for Gram Panchayat elections in Thane district announced | Politics Marathi News - Sarkarnama

ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 5 डिसेंबर 2020

 जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर या सहा तालुक्‍यांमध्ये एप्रिल ते डिसेंबरदरम्यान 158 ग्रामपंचायतींचा कालावधी संपुष्टात येत आहे.

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील सहा तालुक्‍यांतील एप्रिल ते डिसेंबर या कालावधीदरम्यान मुदत संपणाऱ्या 158 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठीचा मतदार यादी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. 

यामध्ये भिवंडी तालुक्‍यातील सर्वाधिक 56 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या निवडणुकांसाठी 1 डिसेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे जिल्ह्यातील एप्रिल महिन्यात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम हाती घेण्यात आला नव्हता. त्यामुळे त्या ठिकाणी प्रशासक नेमण्यात आले होते;

मात्र टप्याटप्याने टाळेबंदीत करण्यात येत असलेली शिथिलता, विविध कार्यक्रम घेण्यास सरकारकडून देण्यात येत असलेल्या परवानगी त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा एप्रिल ते डिसेंबरदरम्यान मुदत संपणाऱ्या 158 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

 जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर या सहा तालुक्‍यांमध्ये एप्रिल ते डिसेंबरदरम्यान 158 ग्रामपंचायतींचा कालावधी संपुष्टात येत आहे. यामध्ये विधानसभेच्या वेळची मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली असून, या मतदार यादीचे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रभागनिहाय विभाजन करण्यात आले आहे.

हरकती नोंदवता येणार
1 डिसेंबर 2020 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच 7 डिसेंबरपर्यंत मतदार यादीवरील हरकती संबंधित तहसीलदार कार्यालयात जाऊन नोंदवता येणार आहेत. तसेच 10 डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख