पंकजा यांनी पाठपुरावा परदेशातून केला होता का? : धनंजय यांचा सवाल - Did Pankaja pursue him from abroad asks Dhananjay Munde | Politics Marathi News - Sarkarnama

पंकजा यांनी पाठपुरावा परदेशातून केला होता का? : धनंजय यांचा सवाल

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

स्व. गोपीनाथराव मुंडे, स्व. पंडित अण्णा मुंडे यांनी अथक प्रयत्नातून वैद्यनाथ कारखान्याला आशिया खंडात अग्रस्थानी नेऊन ठेवले होते. त्या कारखान्यातील कर्मचाऱ्यांवर पगारासाठी उपोषणाची वेळ यावी, हे अत्यंत दुर्दैवी होते, अशी खंत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली होती. 

मुंबई : वैद्यनाथ कारखान्याला राज्य सरकारची थकहमी कोणी मिळवून दिली, यावरून सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यात वाद रंगला आहे. या कारखान्याला थकहमी देताना राजकारणा न पाहता शेतकरी आणि सभासद यांचे हित पाहून निर्णय घेतल्याचा आनंद असल्याचे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले होते. त्यावर पंकजा यांनी आक्षेप घेत केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामुळे हा निर्णय झाल्याचे सांगितले होते. 

त्यावर बोलताना धनंजय यांनी पंकजा मुंडे यांच्यावर नाव न घेता टीका केली. “त्यांनी पाठपुरवठा कधी केला? कसा केला?, परदेशातून केला की मंत्री म्हणून कोणी पाठपुरवठा केला हे कोणालाही समजेल,” असा टोला लगावला. आम्ही पाच वर्षे सुडाच्या राजकारणाचे बळी ठरलो, तरीही सुडाचे राजकारण करणार नाही,” असाही दावा धनंजय यांनी केला.

“परळीच्या कारखान्याबाबत माझं वेगळं मत आहे. तो कारखाना उभा करण्यापासून नीट सुरू होईपर्यंत त्यासाठी माझ्या वडिलांचे योगदान आहे. तो कारखाना बंद राहणं मनाला पटत नव्हतं. भले ही त्याचा कारखाना चेअरमन वेगळ्या पक्षाचा आहे तरी राजकारण करणार नाही,” असं धनंजय मुंडे म्हणाले.

काय म्हणाले होते धनंजय मुंडे?

“आम्ही कारखान्याला निधी दिला आहे. विकासाचे राजकारण केलं आहे. त्यांनीही आता कारखाना चालवावा. शेतकऱ्यांची अडचण दूर करावी, असं सांगतानाच भाजपने सत्तेत असताना केवळ त्यांच्या लोकांच्या साखर कारखान्यांनाच मदत केली. आम्ही तसं करणार नाही. त्यांच्यात आणि आमच्यात हाच फरक आहे, असा चिमटाही त्यांनी काढला. राज्यातील सर्व कारखान्यांना मदत देण्यात आली आहे. राज्य सरकारसाठी ऊस उत्पादक शेतकरी कोणत्या एक पक्षाचा नसतो. म्हणून थक हमी देण्याचा निर्णय घेतला,” असंही त्यांनी स्पष्ट केले होते.

स्व. गोपीनाथराव मुंडे, स्व. पंडित अण्णा मुंडे यांनी अथक प्रयत्नातून वैद्यनाथ कारखान्याला आशिया खंडात अग्रस्थानी नेऊन ठेवले होते. त्या कारखान्यातील कर्मचाऱ्यांवर पगारासाठी उपोषणाची वेळ यावी, हे अत्यंत दुर्दैवी होते. राज्य सरकारने दिलेल्या थक हमीचा कारखाना प्रशासनाने योग्य वापर करून शेतकरी आणि कर्मचाऱ्यांचे हित जोपासावे, थकीत बिले आणि पगार करावेत असा सल्ला धनंजय मुंडे यांनी वैद्यनाथ कारखाना प्रशासनास दिला आहे. हजारो शेतकरी आणि शेकडो कर्मचारी 'वैद्यनाथ' कारखान्याचे लाभार्थी आहेत, त्यांचे हित लक्षात घेत आम्ही यात कधीही राजकारण आणले नाही, उलट कधीही मदत करण्याचीच भूमिका घेतली आहे. यावर्षी कारखाना गळीत हंगाम सुरू होऊन परिसरातील १००% उसाचे गाळप होणे गरजेचे आहे. भविष्यात कधीही वैद्यनाथ कारखान्यासंबंधी कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास राज्य सरकारच्या माध्यमातून ती मदत  करण्यासाठी सदैव तत्पर असल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख